
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कसे जगले आणि कसे लढले ते पहायचे असल्यास पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील एक उत्तम ठिकाण म्हणजे ‘सेवाग्राम आश्रम’ होय. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे.
सन 1933 मध्ये जमनालाल बजाज यांच्या विनंतीवरून गांधीजी काही काळासाठी वर्ध्याला आले. ते प्रारंभी महिला आश्रमाच्या प्रार्थना मंदिरात राहत होते. पुढे सन 1936 मध्ये गांधीजींनी वर्ध्याच्या सीमेवर असलेल्या ‘सेगाव’ नावाच्या गावात आपले निवासस्थान (कुटी) बांधले. ज्याचे नाव त्यांनी ‘सेवाग्राम’ म्हणजे ‘सेवेचे गाव’ असे ठेवले.
जमनालालजींनी या आश्रमासाठी आपली जमीन दिली. गांधीजींनी त्यांच्या झोपडीच्या बांधकामासाठी कोणत्याही परिस्थितीत पाचशे रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नये, अशी अट घातली होती. त्यासाठी वापरले जाणारे साहित्य स्थानिकांकडून खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार सेवाग्राम येथे गांधीजींचे पहिले निवासस्थान ‘आदिनिवास’ बांधण्यात आले.
गांधीजी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांच्या अनुयायांसाठी आश्रमात बांधलेली छोटी राहण्याची ठिकाणे गावातील झोपड्यांसारखीच होती. महत्त्वाच्या राष्ट्रीय बाबी आणि चळवळींचे अनेक निर्णय सेवाग्राम येथे घेण्यात आले. राष्ट्रउभारणीच्या अनेक संस्थांसाठी हे केंद्रस्थान बनले. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते गांधीजींच्या उपक्रमांचे केंद्र राहिले.
सध्या येथील आश्रमातील माणसे प्रार्थना, सूतकताई, अंगमेहनतीची कामे, साफसफाई आणि शेती यासह आश्रमाचे दैनंदिन वेळापत्रक सांभाळतात. ‘सेवाग्राम’ हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. येथे लोक नियमितपणे येत असतात. गांधींनी सन 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत पदयात्रा सुरू केली. तेव्हा त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साबरमतीला परत न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले नव्हते. गांधींना दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगावा लागला.
सुटका झाल्यावर त्यांनी काही काळ प्रवासात घालवला. त्यांनी मध्य भारतातील एका गावाला आपले मुख्यालय बनवण्याचा निर्णय घेतला. जमनालालजी बजाज यांच्या निमंत्रणावरून ते सन १९३४ मध्ये वर्ध्याला आले. गांधीजी सेवाग्रामला आले, तेव्हा 67 वर्षांचे होते. तेव्हापासून सेवाग्राम हे प्रेरणादायी ठिकाण बनले आहे. सेवाग्राम वर्धा शहरापासून 8 किमी आणि नागपूरपासून 75 किमी अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव आहे.
अनेक व्यावहारिक अडचणी असतानाही गांधीजींनी इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत अनेक सहकारी येथे राहू लागले. सेवाग्राम येथे कोणत्याही सुविधा नव्हत्या. टपाल किंवा तार कार्यालयही नव्हते. पत्रे वर्ध्याहून आणावी लागायची.
गांधीजींच्या अनुयायी मीरा बेन यांनी येथे एक कुटी बांधली. ती गांधीजींच्या कार्यालयाकरिता देऊन त्यांनी गावाजवळच स्थलांतर केले. या कुटीलाच आज ‘बापू कुटी’ आणि ‘बापू ऑफिस’ असे संबोधले जाते. गांधीजींना भेटायला बहुसंख्येने अनुयायी येत असत. याच कुटीत कस्तुरबाही राहत. गांधीजींना भेटण्यासाठी अनेकजण येत असल्यामुळे कस्तुरबांसाठी अन्य कुटी बांधली गेली. या कुटीलाच ‘बा’ कुटी म्हणून ओळखले जाते. जेव्हा आपण या कुटीकडे पाहतो, तेव्हा गाधींजींचे साधे राहणीमान आपल्या डोळयासमोर उभे राहते.
या कुटीला बांबू, तट्टयांचे आच्छादन आहे. भिंती पांढऱ्या मातीने सारवलेल्या आहेत. मीरा बेन यांनी कुटीच्या भिंतीवर ओम, बांबूंचे वृक्ष, मोर, चरखा, निसर्गाची चित्रे रेखाटली होती. ती आजही कायम आहेत. खिडक्या, दरवाजे बांबूनींच बनवून स्थानिक पद्धतीने सजविण्यात आलेले आहेत. ग्रामस्थांनी बनविलेल्या तट्टयांचा वापर कुटीच्या आच्छादनासाठी करण्यात आलेला आहे. ‘सिंदी’च्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या चटयांचा वापर गांधीजी करत असत.
बापूंच्या कार्यालयीन कुटीमध्ये आपणाला तत्कालीन दूरध्वनीही पाहायला मिळतो. गांधीजी वापरत असलेले सुंदर पेपरवेटही याठिकाणी ठेवले आहेत; तसेच चिनीमातीतील तीन माकडे सर्वांचे आकर्षण ठरतात. महाराष्ट्रातील हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.