पूर्व अमेरिकेत भीषण हिमवृष्टी – गोठवणाऱ्या थंडीने जनजीवन विस्कळीत

अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये भीषण हिमवृष्टी आणि आर्क्टिक वाऱ्यांमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिम वादळ सदृश परिस्थितीमुळे अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे.

न्यूयॉर्क, बोस्टन आणि फिलाडेल्फिया यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये बारा ते चोवीस इंचांपर्यंत बर्फ साचला आहे. अनेक भागांत तापमान उणे वीस अंश ते उणे तीस अशांपर्यंत खाली घसरले असून, वाऱ्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही थंडी अधिक जीवघेणी ठरत आहे. रस्ते निसरडे झाल्यामुळे हजारो अपघातांची नोंद झाली असून पाच हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, आर्क्टिक प्रदेशातील थंड हवेचा प्रवाह दक्षिण दिशेला सरकल्याने पूर्व अमेरिकेत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याला तांत्रिक भाषेत पोलर व्होर्टेक्स म्हटले जाते. जेव्हा ही थंड हवा अटलांटिक महासागरावरील उबदार हवेच्या संपर्कात येते, तेव्हा हवेचा दाब वेगाने कमी होतो आणि बॉम्बोजेनेसिस प्रक्रिया सुरू होऊन चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण होते. मुसळधार बर्फवृष्टीमुळे आंतरराज्य महामार्ग बंद करावे लागले आहेत. रेल्वे रुळांवर बर्फ साचल्याने एमट्रॅक सेवा खंडित झाली आहे. विमानतळांवर प्रवाशांच्या रांगा लागल्या असून, रनवेवरील बर्फ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

वेगवान वारे आणि जड बर्फामुळे झाडे पडून वीजवाहिन्या तुटल्या आहेत. यामुळे व्हर्जिनिया, मेरीलँड आणि पेनसिल्व्हेनियामधील सुमारे पाच लाख घरे अंधारात आहेत. कडाक्याच्या थंडीत हीटिंग सिस्टम बंद पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. उघड्यावर राहणाऱ्या लोकांसाठी तात्पुरते वॉर्मिंग सेंटर्स उघडण्यात आले आहेत. अतिथंडीमुळे फ्रॉस्टबाइट आणि हायपोथर्मियाचा धोका वाढला असून रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याने इशारा दिला आहे की, ही थंडीची लाट येत्या आठवडाभर कायम राहू शकते. बर्फवृष्टी थांबली तरी, साचलेला बर्फ वितळण्याऐवजी गोठत असल्याने रस्ते अधिक धोकादायक बनणार आहेत. तसेच, किनारपट्टीच्या भागात समुद्र खवळलेला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर आणि इतर राज्यांच्या प्रमुखांनी नॅशनल गार्डला पाचारण केले असून रस्ते साफ करण्यासाठी हजारो स्नो प्लो तैनात करण्यात आले आहेत. शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली असून वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिला आहे. पूर्व अमेरिकेतील ही परिस्थिती पश्चिम अमेरिकेतील बर्फ दुष्काळाच्या बरोबर उलट आहे, जे हवामान बदलाचे एक टोकाचे उदाहरण मानले जात आहे.






9,680 वेळा पाहिलं