देवगडमधील श्री देव रामेश्वर मंदिर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला एक तालुका आहे. अत्यंत निसर्गरम्य असा हा भाग पर्यटकांच्या मनात भरणारा असाच आहे. तालुक्यातील ‘वेळगिवे’ या गावात श्री देव रामेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. कुणकेश्वर मंदिरासारखेच लेणे असलेले श्री रामेश्वर देव मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर फार सुंदर व आकर्षक आहे. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते. प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आजही उत्तम स्थितीत आहे. येथील लोकांचे ते श्रध्दास्थान आहे.
खरे पाहता ‘वाघिवरे’ व ‘वेळगिवे’ या गावांच्या सीमेवरील जांभ्या दगडात हे रेखीव मंदिर खोदले आहे.

सद्यस्थितीत मंदिराचा कळस सिमेंट लावून रंगवला असल्याने हे देऊळ पटकन लक्षात येते. खिंडीतील पायऱ्या उतरून या मंदिराकडे जावे लागते. या मंदिराला फारशी उंची नाही. जांभ्या दगडात खोदलेल्या या मंदिरात छोटासा सभामंडप आहे. दोन्ही बाजूंना खोल्या व श्री देव रामेश्वरचा गाभारा अशा प्रकारचे हे मंदिर आहे. मंदिराच्या आत नेहमीच थंडावा असतो. बाहेर कितीही उष्मा असला तरीही मंदिरात मात्र थंडावा जाणवतो, हे खास वैशिष्ट्य आहे. थंडावा असल्यामुळे मंदिरात वटवाघळे आढळतात. या मंदिराजवळ आलोबाचे जागृत देवस्थान आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे या गावापासून अवघ्या 8 कि. मी. अंतरावर ‘वेळविले’ हे गाव आहे. अतिशय निसर्गसंपन्न असल्याने हे गाव फार सुंदर आहे. तेथे जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. हे मंदिर पांडवकालीन असून एका खडकात कोरलेले आहे. या मंदिराला मोठे सहा दगडी खांब आहेत. आतील भागात शिवलिंग आहे. या मंदिराची रचना भुयारी स्वरूपाची आहे. या गावातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानूसार, हे एक पांडवकालीन लेणे आहे. पांडव अज्ञातवासात असताना त्यांना या मंदिराचे काम एका रात्रीत पूर्ण करावयाचे होते; मात्र काम करीत असतानाच पहाट झाल्यामुळे मंदिराचे उर्वरित काम अर्धवट सोडून पांडव तेथून निघून गेले. देवगड हे तालुक्याचे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर विसावलेले आहे.

देवगडमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. हे एक छोटे बंदर आहे. येथील देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे. देवगड तालुक्यातील दुसरा किल्ला विजयदुर्ग अर्थात घेरिया हा शिलाहार राजघराण्यातील राजा भोज द्वितीय याने बांधला. त्यानंतर आदिलशाह, शिवाजी महाराज यांनी त्यावर राज्य केले. ब्रिटिश राज्यकर्त या किल्ल्याला त्याच्या अभेद्यपणासाठी ‘पूर्वेकडचे जिब्राल्टर’ असे म्हणत. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले हे गाव देवगडमध्ये पाहता येईल. सागरकिनारा, निसर्गसंपन्नता याशिवाय अन्य कित्येक ठिकाणे पर्यटकांना देवगडमध्ये पाहता येतील.

देवगडला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कणकवली हे आहे. कणकवली येथून देवगडला जाण्यासाठी ऑटो-रिक्षा किंवा राज्य परिवहन बसगाड्या मिळू शकतात.विमानाने जायचे असल्यास सिंधुदुर्गातील चिपी व गोव्यातील मोपा ही जवळची विमानतळे आहेत.






15,925 वेळा पाहिलं