
सोलापूर जिल्ह्यात गाणगापूर हे दत्तगुरुंचे पवित्र स्थान आहे. ‘भीमा’ आणि ‘अमरजा’ या नद्यांच्या संगमाकाठी हे सुंदर मंदिर आहे. येथे दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य होते. हे एक जागृत स्थान असून अनेक भक्तांचे व्याधी आणि बाधा निवारण केले जाते. येथे नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. ‘गाणगापूरग्रामी श्रीदत्तगुरू यांचा प्रत्यक्ष वास आहे’, असे ‘गुरुचरित्र’ ग्रंथात स्वत: नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे.
गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षांपासून कायम आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन आनंदी करतात, असा अनुभव अनेक भक्ताना आला आहे. भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य दत्त महाराज करीत असल्याचे भाविक सांगतात.
याच गावात ‘भीमा-अमरजा संगमा’वर दत्तगुरु दररोज स्नान करतात. दुपारच्या वेळेस भिक्षेसाठी कोणत्याही वेषात उपस्थित असतात, असे महाराज सांगतात. एकाग्रतेने नामस्मरणात तल्लीन झाल्यावर दत्तगुरु दर्शन देतातच, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
गाणगापुरातून निघताना श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या पादुका शिष्याकडे देऊन सांगितले की, ”या निर्गुण पादुका आहेत. या पादुकांमध्ये माझा सगुण रुपाने वास राहील. येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका. हा आमचा आशीर्वाद आहे. त्यावर विश्वास ठेवा.”
‘भीमा-अमरजा या संगमात स्नान केल्याने भाविकांची पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतो’, असे भक्त सांगतात. निर्गुण मठातील पादुकांचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक संगमावर स्नान करतात.
गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. यामध्ये ‘षट्कुल तीर्थ’, ‘नृसिंह तीर्थ’, ‘भागीरथी तीर्थ’, ‘पापविनाशी तीर्थ’, ‘कोटी तीर्थ’, ‘रुद्रपाद तीर्थ’, ‘चक्रेश्वर तीर्थ’ आणि ‘मन्मथ तीर्थ’ अशी तीर्थे आहेत. भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात.
संगमापासून वर जाताना ‘पवित्र औदुंबर वृक्ष’ आहे. या वृक्षाखाली साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत. औदुंबरास ११,२१,१०८ प्रदक्षिणा घातल्यावर आपली कुठलीही मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
या दिव्य वृक्षाखाली अनेक भाविक ‘गुरुचरित्र’ या जागृत ग्रंथाचे पारायण करतात. येथे ‘भस्माचा डोंगर’ हे एक दिव्य आहे. येथे अनेक ऋषीमुनींनी तपसाधना केल्यामुळे या भूमीवरील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात.
श्रीक्षेत्र गाणगापूर येथे अनेक उत्सव भक्तीभावाने साजरे होतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला श्री व्यासपूजा साजरी केली जाते. संपूर्ण श्रावणात भक्तमंडळी श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रींची पालखी भक्तमंडळींसह सायंकाळी श्री कल्लेश्वर मंदिरात जाऊन रात्री परत येते.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतारसमाप्तीचा उत्सव गुरुद्वादशीला होतो. त्या वेळेस भाविकांसाठी महाप्रसाद असतो.