कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात सिंधुदुर्ग अग्रणी – नीती आयोगाचे पथक जिल्हा दौर्यावर
सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा यशस्वी आणि प्रभावी वापर सुरू केला आहे. देवव्रत त्यागी आणि विदीशा दास यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान पोलीस विभाग आणि रस्ते परिवहन विभागाकडून एआय प्रणालीचा वापर कशा प्रकारे केला जात आहे, याविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, आणि तहसिलदार दिक्षांत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील एआय वापराची संपूर्ण माहिती दिली. सागरी सुरक्षेसाठी एआय प्रणालीवर आधारित ‘सिंधुप्रहरी’ या उपक्रमाची माहिती त्यांनी सविस्तरपणे मांडली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलाने एआय प्रणालीवर आधारित अत्याधुनिक स्मार्ट सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे अपरिचित चेहऱ्यांची लवकर ओळख, त्वरित इशारे, सागरी सुरक्षेत वाढ आणि गुन्हे प्रतिबंध अधिक प्रभावीपणे साध्य झाले आहेत. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहीत केल्याने तपास आणि विश्लेषण अधिक अचूक झाले आहे.
डॉ. दहिकर यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे पोलीस यंत्रणा अधिक सजग, तत्पर आणि कार्यक्षम झाली आहे. स्वयंचलित निरीक्षणामुळे मनुष्यबळ आणि संसाधनांचा अधिक प्रभावी वापर होतो आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने राज्यात तांत्रिक प्रगतीचा आदर्श निर्माण केला आहे.
यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी सादरीकरण करून जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे आणि हवामानातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा आणि अपघात नियंत्रणात कशी सुधारणा करता येते हे दाखवून दिले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचालकांनी सुरक्षा साधनांचा वापर न केल्यास त्यांना फेसलेस पद्धतीने दंड करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुढील टप्प्यात या प्रणालीचा वापर अपघाताच्या प्रसंगी आपत्कालीन बचाव यंत्रणांना – जसे की पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रक्तपेढी – त्वरित सूचना पाठवण्यासाठी तसेच अपघातप्रवण क्षेत्रांचे निरीक्षण करण्यासाठी केला जाणार आहे. नीती आयोगाच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या उपक्रमाचे कौतुक करत इतर जिल्ह्यांसाठीही हे मॉडेल आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.