राज्य सरकारकडून आदिशक्ती अभियानाला गती

राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एकूण तीनशे एकावन्न तालुका समित्या आणि सव्वीस हजार एकोणसाठ ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या प्रशिक्षणाला गती देऊन अभियानाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

‘आदिशक्ती अभियान व पुरस्कार योजने’ संदर्भात मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी मंत्री आदिती तटकरे यांनी विभागनिहाय कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस विभागाचे सचिव डॉक्टर अनुपकुमार यादव, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहूल मोरे, तसेच अवर सचिव सुनील सरदार उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागाचे आयुक्त, एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे, तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागांचे विभागीय आयुक्त या बैठकीत सहभागी झाले होते.

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण, महिला सुरक्षा आणि न्यायप्रवेश, आरोग्य व पोषण जनजागृती, शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगती, नेतृत्व विकास आणि सामाजिक सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती आणि जनजागृती ग्रामपातळीपर्यंत पोहोचविणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्यांचे प्रशिक्षण तातडीने पूर्ण करून त्याचे अहवाल लवकरात लवकर सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना मंत्री तटकरे यांनी संबंधित विभागीय आयुक्तांना दिल्या. समित्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि योजनांची अंमलबजावणी पारदर्शकतेने व्हावी, यावरही त्यांनी भर दिला.

तसेच, ‘ग्रामसमृद्धी योजने’च्या धर्तीवर ग्रामसभांमध्ये या अभियानाचा प्रसार करण्याचे निर्देशही देण्यात आले. अभियानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी माहिती पुस्तिका तयार करून वितरण करण्यात यावे, असे आदेश देत मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि समित्यांना महिला सक्षमीकरणासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

State government accelerates Adi Shakti Mission






10,938 वेळा पाहिलं