
महाराष्ट्रातील कौशल्यप्राप्त तरुणांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांची परदेशातील नोकरीची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य सरकारने महिमा या स्वतंत्र संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांचे परदेशात करिअर करण्याचे स्वप्न आता सरकारी पाठबळावर पूर्ण होऊ शकणार आहे. महिमा ही संस्था राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत काम करेल. ही संस्था प्रामुख्याने इंटरनॅशनल मोबिलिटी सेंटर म्हणून ओळखली जाईल. जगभरातील विकसित देशांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्रातील तरुणांना त्या देशांतील निकषांनुसार तयार करणे आणि त्यांना तिथे सन्मानाने नोकरी मिळवून देणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असेल.
परदेशातील नोकरीसाठी आवश्यक असलेले तांत्रिक कौशल्य आणि त्या देशाची भाषा यांचे विशेष प्रशिक्षण ही संस्था उपलब्ध करून देईल. जर्मनी, जपान, इस्रायल, मॉरिशस आणि आखाती देशांमधील सरकारी व खासगी संस्थांशी ही संस्था थेट समन्वय साधेल. परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी महिमा ही अधिकृत आणि विश्वासार्ह माध्यम म्हणून काम करेल. व्हिसा मिळवणे, पासपोर्ट प्रक्रिया आणि परदेशातील कामाचे परवाने तरुणांना कायदेशीर मदत केली जाईल.
जागतिक बाजारपेठेचा विचार करता, प्रामुख्याने कुशल तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. आरोग्य सेवेतील परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टाफ, बांधकाम सेवेतील इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञ, हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रातील शेफ आणि सेवा कर्मचारी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि डेटा तज्ज्ञ यांना प्राधान्य मिळेल. महाराष्ट्रात दरवर्षी लाखो तरुण पदवीधर होतात, मात्र देशांतर्गत बाजारपेठेत मर्यादित संधी असल्याने बेरोजगारीचा प्रश्न उद्भवतो. दुसरीकडे, युरोपीय देश आणि जपानसारख्या देशांमध्ये वृद्धांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांना तरुण आणि कुशल कामगारांची मोठी गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीही जपान आणि जर्मनीच्या दौऱ्यात याबाबत सकारात्मक चर्चा केली होती. ‘महिमा’च्या माध्यमातून आता या चर्चेला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या संस्थेच्या स्थापनेसाठी सुरुवातीला आवश्यक निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ही संस्था केवळ नोकरी मिळवून देण्यापुरती मर्यादित न राहता, परदेशात गेलेल्या मराठी तरुणांच्या अडीअडचणीत मदतीसाठी एक ‘हेल्पलाईन’ म्हणूनही काम करेल. येत्या काही महिन्यांत या संस्थेचे मुख्यालय मुंबईत सुरू होणार असून, विभागांनुसार प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली जातील.