
मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील कीटकनाशक विक्रेते आणि पेस्ट कंट्रोल व्यावसायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कीटकनाशकांचा साठा, विक्री किंवा फवारणी करण्यासाठी कृषी विभागाचा अधिकृत परवाना असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. जे व्यावसायिक किंवा दुकानदार विनापरवाना हा व्यवसाय करतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी दिला आहे.
शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, सुपर मार्केट आणि बझारमध्ये घरगुती वापराची कीटकनाशके म्हणजे झुरळ, उंदीर, ढेकूण, डास मारण्याची औषधे विनापरवाना विकली जात आहेत. अनेकदा छोट्या दुकानांमध्ये अशा औषधांची विक्री करताना नियमांचे पालन केले जात नाही. मात्र, केंद्र शासनाच्या कीटकनाशक कायदा १९६८ आणि कीटकनाशक नियम १९७१ नुसार, अशा प्रकारच्या विक्रीसाठी परवाना घेणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. केवळ विक्रीच नाही, तर घरांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या संस्थांकडेही कृषी विभागाचा परवाना असणे आवश्यक आहे. विनापरवाना फवारणी करणे हे मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे अशा व्यावसायिकांनी त्वरित आपले परवाने अधिकृत करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी स्पष्ट केले की, विनापरवाना कीटकनाशकांचा व्यवसाय करणे हे कीटकनाशक नियमाचे थेट उल्लंघन आहे. घरगुती कीटकनाशके साठा व विक्रीचे परवाने आता नियमानुसार कायमस्वरूपी दिले जातात. मात्र, त्यामधील प्रमाणपत्रे जुनी झाली असल्यास पुन्हा समाविष्ट करणे गरजेचे आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या कीटकनाशकांच्या वापरासाठी विशेष परवान्याची आवश्यकता असते, त्याशिवाय त्यांचा वापर करणे गुन्हा आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पेस्ट कंट्रोल आणि कीटकनाशकांची मागणी मोठी आहे. याचाच फायदा घेऊन अनेक अनधिकृत विक्रेते सक्रिय झाले आहेत. कृषी विभागाची गुणनियंत्रण शाखा आता अशा विक्रेत्यांवर आणि व्यावसायिकांवर विशेष पाळत ठेवून आहे. या शाखेला विनापरवाना साठा जप्त करण्याचे आणि कायदेशीर खटले भरण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. कोकण विभागाच्या कृषी विभागाने मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्वरित आपले परवाने काढून घ्यावेत. यामुळे व्यवसायात पारदर्शकता येईल आणि नागरिकांनाही दर्जेदार व सुरक्षित सेवा मिळेल. नागरिकांनीही पेस्ट कंट्रोल करून घेताना किंवा औषधे खरेदी करताना संबंधित दुकानदाराकडे कृषी विभागाचा वैध परवाना आहे का, याची खात्री करावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.