अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने आणि मुंबई अग्निशमन दलाने कंबर कसली आहे. मुंबईतील रेस्टॉरंटस्, आणि मॉल यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा नियमांचे कठोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत ठिकठिकाणी पार्टी आणि सोहळ्यांचे आयोजन केले जाते. अशा वेळी गर्दीच्या ठिकाणी आगीचा धोका निर्माण होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत रेस्टॉरंटस्, हॉटेल्स् आणि कॅफे, जिमखाने आणि बँक्वेट हॉल्स, मॉल आणि सिनेमागृहे, लॉजिंग-बोर्डिंग आणि रिसॉर्ट्स आस्थापनांची प्राधान्याने तपासणी केली जाणार आहे.

अग्निशमन दलाच्या पथकांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत जर एखाद्या आस्थापनेने अग्निसुरक्षेच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे आढळले, तर त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मधील तरतुदींनुसार कडक कारवाई केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्यास दंड आकारला जाऊ शकतो. गंभीर उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनेचा वीज आणि पाणी पुरवठा त्वरित खंडित करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रियाही महापालिका राबवू शकते.

अग्निशमन दलाचे अधिकारी तपासणी दरम्यान इमारतीत फायर एक्स्टिंग्विशर, स्प्रिंकलर सिस्टम आणि फायर हायड्रंट्स सुस्थितीत आहेत की नाही, आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे आहेत का, अनेकदा हे मार्ग सामानाने अडवलेले असतात, त्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैला अधिकृत एजन्सीकडून अग्निसुरक्षा तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. त्याची तपासणी केली जात आहे. आगीच्या बहुतांश घटना शॉर्ट सर्किटमुळे होतात, त्यामुळे विद्युत यंत्रणेचे योग्य ऑडिट झाले आहे का, हे पाहिले जात आहे. मुंबई अग्निशमन दलाने केवळ व्यावसायिक आस्थापनांनाच नाही, तर मोठ्या गृहनिर्माण संस्थांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इमारतींच्या गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत अनधिकृत शेड उभारणे किंवा ज्वलनशील पदार्थांचा साठा करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.






2,602 वेळा पाहिलं