गुणवत्तेशी तडजोड केल्यास कठोर कारवाई – गिरीश महाजन यांचे कडक निर्देश

सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून ती नाशिकच्या विकासाची मोठी संधी आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने आणि गतीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. कुंभमेळ्यासाठी होणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि विहित वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत, यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेत ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात प्रयागराज कुंभमेळ्याचा संदर्भ दिला. प्रयागराजच्या तुलनेत नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील भौगोलिक जागा अत्यंत मर्यादित आहे. मात्र, येणाऱ्या भाविकांची संख्या गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत चार ते पाच पटीने वाढणार आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापनासह पायाभूत सुविधांचे अत्यंत सखोल आणि शिस्तबद्ध नियोजन करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

शहरात सध्या रस्ते, काँक्रीटीकरण, गोदावरी स्वच्छता आणि मलनिस्सारण प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांना तात्पुरती गैरसोय होत असली तरी, ही कामे भविष्याचा विचार करून दर्जेदार होणे आवश्यक आहे. शासनाने कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा एकही रुपया वाया जाता कामा नये. कामात त्रुटी आढळल्यास किंवा हलगर्जीपणा दिसून आल्यास शासन संबंधितांवर कठोर कारवाई करेल, असे महाजन यांनी ठणकावून सांगितले. जगभरातून येणाऱ्या भाविकांनी नाशिकच्या नियोजनाबद्दल आणि इथल्या सुविधांबद्दल सकारात्मक भावना घेऊन जावे, यादृष्टीने प्रत्येक अधिकाऱ्याने ही आपली वैयक्तिक जबाबदारी समजून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिकमधील पावसाळ्याचा विचार करून अभियांत्रिकी नियोजन करण्याचे सुचवले. पावसाच्या तीव्रतेमुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, यासाठी साहित्याची निवड आणि वेळापत्रक हवामानाशी सुसंगत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयआयटी मुंबईचे डॉ. धर्मवीर सिंह यांनी काँक्रीट आणि बिटुमिनस रस्त्यांच्या बांधकामातील तांत्रिक मानकांचे महत्त्व समजावून सांगितले. कामांची पारदर्शकता तपासण्यासाठी ‘आयएसओ’ मानकांनुसार तपासणी आणि अहवाल प्रक्रियेवर अविनाश आठवले यांनी सादरीकरण केले. विकास ठाकर यांनी नागरी पायाभूत सुविधा आणि पावसाळी पाण्याचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. यावेळी गुणवत्ता नियंत्रण हा केवळ कामाचा भाग नसून तो नियोजनाचा आत्मा आहे. सर्व यंत्रणांमधील समन्वय आणि सातत्यपूर्ण देखरेख यामुळेच सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडू शकेल, असे मत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केले.या  कार्यशाळेला विविध विभागांचे अभियंते, गुणवत्ता नियंत्रण संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.






918 वेळा पाहिलं