
भारताच्या संरक्षण सज्जतेत एक ऐतिहासिक सुवर्णक्षण नोंदवला गेला. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या अब्दुल कलाम बेटावरून प्रलय या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सलग दोन यशस्वी उड्डाणे करून शत्रू राष्ट्रांना भारताचे वाढते सामर्थ्य दाखवून दिले आहे.
या चाचणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रलय क्षेपणास्त्राचे सल्वो लॉन्च. लष्करी परिभाषेत सल्वो लॉन्च म्हणजे एकाच लाँचरमधून अत्यंत कमी कालावधीच्या अंतराने दोन किंवा अधिक क्षेपणास्त्रे डागणे. भारताने पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून आपली मारक क्षमता आणि वेगवान हल्ल्याचे कौशल्य जगाला दाखवून दिले आहे. बुधवारी सकाळी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी मोबाइल लाँचरद्वारे पहिले क्षेपणास्त्र डागले आणि त्यानंतर काही मिनिटांतच त्याच लाँचरवरून दुसरे प्रलय क्षेपणास्त्र आकाशात झेपावले. दोन्ही क्षेपणास्त्रांनी बंगालच्या उपसागरातील आपल्या निर्धारित लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व तांत्रिक बाबी, नेव्हिगेशन सिस्टीम आणि मारक क्षमतेची काटेकोर तपासणी करण्यात आली.
प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे हे क्षेपणास्त्र दीडशे ते पाचशे किलोमीटर अंतरावरील शत्रूची ठिकाणे नष्ट करू शकते. हे पाचशे ते हजार किलो वजनाचे स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे. यामध्ये अत्याधुनिक ‘क्वासी-बॅलिस्टिक’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे हे क्षेपणास्त्र हवेत असतानाच आपला मार्ग बदलू शकते.
प्रलय क्षेपणास्त्राची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ते शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करतात. हे क्षेपणास्त्र आकाशात ठराविक उंचीवर गेल्यावर आपला मार्ग बदलण्याची क्षमता ठेवते. यामुळे शत्रूच्या रडार यंत्रणेला त्याचा अचूक अंदाज लावणे आणि ते पाडणे अशक्यप्राय होते. भारत-चीन सीमा आणि भारत-पाकिस्तान सीमा या दोन्ही आघाड्यांवर भारताची ताकद वाढवण्यासाठी ‘प्रलय’ अत्यंत महत्त्वाचे आहे. चीनकडे डॉन्गफेंग-बारा सारखी क्षेपणास्त्रे आहेत. प्रलयच्या यशस्वी चाचणीमुळे भारताने आता चीनच्या बरोबरीने या क्षेत्रात स्थान मिळवले आहे. भारतीय लष्कर आता आपली स्वतंत्र रॉकेट फोर्स तयार करण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये प्रलय हे मुख्य शस्त्र असेल. युद्धभूमीवर शत्रूचे एअरबेस, रडार यंत्रणा किंवा लष्करी तळांवर हल्ला करताना एका क्षेपणास्त्राने काम फत्ते होईलच असे नाही. अशा वेळी एकापाठोपाठ दोन किंवा अधिक क्षेपणास्त्रे डागल्यास, शत्रूला सावरण्याची संधी मिळत नाही आणि त्यांचे लक्ष्य उद्ध्वस्त होण्याची खात्री असते.