रेडीचा स्वयंभू द्विभूज श्री गणेश

सिंधुदुर्ग हा तळकोकणातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची समृद्धी या जिल्ह्यास लाभली आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात रेडी हे असेच लोकप्रिय गाव आहे. लोहखनिजांच्या खाणींनी संपन्न असलेल्या या गावाचा लौकिक येथील स्वयंभू द्विभूज श्री गणेश मंदिरामुळे वाढला आहे. रेडीच्या या देवस्थानातील श्री गणेशमूर्ती स्वयंभू आणि द्विभुज आहे. देशभरात अगदी मोजक्याच ठिकाणी द्विभुज गणेशाच्या मूर्ती आढळतात. म्हणूनच रेडी येथील गणेश मंदिराचे महत्त्व अधिक आहे.

या मंदिराशेजारी अरबी समुद्राचा अथांग विस्तीर्ण किनारा, उंच नारळाची झाडे असे निसर्गरम्य चित्र आहे. हे शांत वातावरण भाविकांसह पर्यटकांचा ठाव घेणारे आहेत. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील लाखो भक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या द्विभुज गणेशाचा इतिहास ५० वर्षापूर्वीचा आहे.

सन १९७३ मध्ये १८ एप्रिलला रेडी येथील लोहखनिजाच्या खाणीवर ट्रकचालक म्हणून कामाला असणारे सदानंद कांबळी रात्री काम संपवून ट्रक लावला. थोड्या वेळाने ट्रक नेहमीच्या जागी लावून ते घरी जाण्याच्या विचारात होते; पण ट्रक काही केल्या सुरू होईना. खूप वेळ प्रयत्न करूनही यश येत नव्हते. मग ते ट्रकमधेच झोपी गेले. रात्री त्यांना एक स्वप्न पडले. ‘मी इथे आहे, मला बाहेर काढ,’ असा दृष्टांत स्वप्नात गणपतीने दिला. सदानंदना जाग आली, तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. गावात जाऊन माहिती देण्यासाठी ते उठले. रात्रभर अनेकदा प्रयत्न करूनही सुरू न झालेला ट्रक क्षणार्धात सुरू झाला.

दुसऱ्या दिवशी गावात त्यांनी हा सारा प्रकार सांगितला. ग्रामदेवता श्री माऊलीचा कौल घेण्यात आला. स्वप्नात संकेत मिळालेल्या जागी खोदकाम सुरू झाले. आठ फूट खोल खणल्यावर १ मे १९७६ ला संपूर्ण मूर्ती दिसू लागली. ती स्वयंभू अन द्विभुज होती. नंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रेडी येथील गणेश मंदिरातील ही मूर्ती जांभ्या दगडात कोरलेली आहे. मूर्तीच्या बाहेर मकराकृती कोरीवकाम केले आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. मूर्तीला दोन हात असून एका हातात मोदक आहे. दुसरा हात आशीर्वाद देतो. मूर्तीच्या समोर मोठा उंदीर आहे. हा उंदीरही गणेश मूर्ती मिळाल्यानंतर सव्वा महिन्याने तिथूनच अर्ध्या किलोमीटरवर सापडल्याचे सांगतात.
सावंतवाडी, वेंगुर्ल्याच्या साप्ताहिकांनी, दैनिकांनी दखल घेतली. पुढे महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा येथे हे वृत्त पसरले. रेडी येथील गणेश मंदिराच्या स्थापनेनंतर गणेश जयंती, वर्धापन दिन, संकष्टी, अंगारकी असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक संकष्टीला हजारोंच्या संख्येने तिथे भाविक येतात. अंगारकीला ही संख्या हजारोंच्या घरात असते. पर्यटनस्थळ म्हणून हे नावारुपास आलेले ठिकाण आहे.






12,573 वेळा पाहिलं