
भारताच्या भव्य त्रि-सेवा सैन्य युद्धाभ्यासाच्या तयारीने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारत हा सराव केवळ नियमित लष्करी तयारीचा भाग म्हणून करीत असला, तरी पाकिस्तानच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताच्या या युद्धाभ्यासाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या देशातील अनेक महत्त्वाच्या हवाई मार्गांना तात्पुरते बंद केले आहे. पाकिस्तानने “नोटॅम” म्हणजेच विमानवाहतुकीसाठी सूचना जारी करून 28 ते 29 ऑक्टोबरपर्यंत हवाई मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानने हा नोटॅम इस्लामाबाद, लाहोर, रहिम यार खान आणि नियंत्रणरेषेजवळील भागांमध्ये लागू केला आहे. भारताच्या सरावास सुरुवात होण्याआधीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. इस्लामाबाद आणि अफगाणिस्तान सीमेच्या परिसरात 28 ऑक्टोबर सकाळी सात वाजल्यापासून 29 ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत नोटॅम लागू राहणार आहे. तसेच लाहोर क्षेत्रात 28 ऑक्टोबर पहाटे बारा वाजून एक मिनिटापासून ते 29 ऑक्टोबर सकाळी चार वाजेपर्यंत हा आदेश प्रभावी राहील. ही पाकिस्तानकडून जारी केलेली दुसरी नोटॅम सूचना आहे.
दरम्यान, भारताने तीस ऑक्टोबरपासून दहा नोव्हेंबरपर्यंत अरबी समुद्रातील अठ्ठावीस हजार फूट उंचीपर्यंतचे हवाई क्षेत्र आपल्या त्रि-सेवा युद्धाभ्यासासाठी राखून ठेवले आहे. या सरावात भारतीयसेना, नौदल आणि हवाई दल संयुक्तरीत्या सहभागी होणार आहेत. “एक्स त्रिशूल” या नावाने ओळखला जाणारा हा युद्धाभ्यास भारताच्या लष्करी तयारीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
या सरावाद्वारे भारतीय सैन्य तीनही दलांमधील समन्वय, बहु-क्षेत्रीय कार्यक्षमता आणि युद्धस्थितीतील तत्परता तपासणार आहे. संयुक्त संचालन, माहितीची देवाणघेवाण आणि प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ञांच्या मते, हा युद्धाभ्यास भारताच्या सामरिक सामर्थ्याचे प्रतिक असून, भविष्यातील आव्हानांसाठी सैन्य सज्ज ठेवण्याचा तो एक प्रयत्न आहे.
भारताच्या या नियोजित युद्धाभ्यासामुळे पाकिस्तानने आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने सावध भूमिका घेत हवाई मार्ग बंद ठेवले आहेत. तथापि, भारतीय सैन्याने या सरावाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या हालचालींमुळे भारताच्या संरक्षण सज्जतेची जाणीव आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ठळकपणे होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.