तिसऱ्या टप्प्यातील तांत्रिक बिघाडामुळे अन्वेषा मोहीम अयशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला आहे. २०२६ सालातील पहिल्याच मोहिमेत इस्रोच्या वर्कहॉर्स मानल्या जाणाऱ्या पीएसएलव्ही रॉकेटला मोठ्या तांत्रिक अपयशाचा सामना करावा लागला. प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात रॉकेट आपल्या निर्धारित मार्गावरून भरकटल्याने अन्वेषा या महत्त्वाच्या गुप्तचर उपग्रहासह इतर सोळा उपग्रह नियोजित कक्षेत प्रस्थापित होऊ शकले नाहीत.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी या मोहिमेने अवकाशात झेप घेतली. सुरुवातीचे दोन टप्पे अपेक्षेप्रमाणे पार पडले. मात्र, रॉकेट जेव्हा तिसऱ्या टप्प्यात पोहोचले, तेव्हा प्रक्षेपकाच्या हालचालींमध्ये कमालीची अस्थिरता दिसून आली. या तांत्रिक बिघाडामुळे रॉकेटने आपला उड्डाण मार्ग बदलला आणि अपेक्षित वेग प्राप्त करण्यात ते अपयशी ठरले. इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी या अपयशाची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस रॉकेटमध्ये मोठे विक्षेप पाहायला मिळाले. यामुळे रॉकेट मार्गावरून विचलित झाले. उपग्रहांना ज्या उंचीवर आणि वेगाने सोडणे आवश्यक होते, ते साध्य होऊ शकले नाही. यामुळे अन्वेषा आणि इतर उपग्रह अवकाशातच नष्ट झाले किंवा चुकीच्या कक्षेत गेल्याने निकामी झाले आहेत.

या मोहिमेत भारतासह जगाचे लक्ष लागून राहिलेले अनेक महत्त्वाचे उपग्रह होते. डीआरडीओने विकसित केलेला हा भारताचा प्रगत हायपरस्पेक्ट्रल गुप्तचर उपग्रह होता. सीमेवरील हालचाली टिपण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. बंगळुरूच्या ऑर्बिटएडचा अंतराळात इंधन भरण्याचे तंत्रज्ञान तपासणारा उपग्रह आणि हैदराबादच्या स्टार्टअपचे एआय इमेजिंग लॅब पेलोड देखील या मोहिमेचा भाग होते. मॉरिशस, स्पेन आणि ब्रिटन यांसारख्या देशांचे पंधरा सह-प्रवासी उपग्रह या मोहिमेत होते, ज्यांचे आता मोठे नुकसान झाले आहे.

पीएसएलव्ही हे इस्रोचे आजवरचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट मानले जाते. मात्र, गेल्या काही काळातील हे दुसरे मोठे अपयश आहे. पीएसएलव्ही-सी एकसष्ट मोहीम देखील तिसऱ्या टप्प्यातील बिघाडामुळे अयशस्वी झाली होती. तर जानेवारी २०२६ सलग दुसऱ्यांदा पीएसएलव्हीच्या तिसऱ्या टप्प्यातच बिघाड झाल्याने शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एकाच टप्प्यात वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे पीएसएलव्हीच्या रचनेत किंवा उत्पादनात काही गंभीर त्रुटी आहेत का, याचा तपास करण्यासाठी इस्रोने उच्चस्तरीय ‘बिघाड विश्लेषण समिती’ स्थापन केली आहे. या अपयशाचा परिणाम इस्रोच्या आगामी महत्त्वाकांक्षी मोहिमांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः गगनयान मोहिमेच्या पूर्वतयारीवर आणि व्यावसायिक प्रक्षेपणांच्या ऑर्डरवर याचा परिणाम होऊ शकतो. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडद्वारे मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय करारांवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.






4,933 वेळा पाहिलं