
राज्यभरातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि सुलभ सेवा देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न, पदोन्नती आणि इतर महत्त्वाच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नोंदणी व मुद्रांक विभागावरील कामाचा ताण आणि रिक्त जागांमुळे होणारी अडचण लक्षात घेता, मंत्र्यांनी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. महसूल विभागाच्या धर्तीवरच या विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले आहे. विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी यशदा सारख्या नामांकित संस्थेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमध्ये कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढण्यास मदत होईल.
पायाभूत सुविधांबाबत भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, अनेक ठिकाणी मुद्रांक व नोंदणी कार्यालये खासगी जागेत भाड्याने सुरू आहेत. अशा कार्यालयांच्या अडचणी लक्षात घेता, ही कार्यालये शासकीय जागेत स्थलांतरित करण्यासाठी जिल्हानिहाय अहवाल तयार करावा. त्यानंतर एक सर्वसमावेशक आराखडा तयार करून ही कार्यालये सुसज्ज शासकीय इमारतींमध्ये हलवली जातील.
दस्तांच्या नोंदणी प्रक्रियेत काम करताना नोंदणी अधिकाऱ्यांवर अनेकदा तक्रारी किंवा गुन्हे दाखल होण्याचे प्रकार घडतात. यावर कडक भूमिका घेत मंत्र्यांनी स्पष्ट केले की, एखाद्या दस्ताच्या अनुषंगाने नोंदणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावयाचा असल्यास, थेट कारवाई न करता त्याबाबत प्रथम नोंदणी महानिरीक्षकांकडून तांत्रिक माहिती व अभिप्राय घेण्यात यावा. दस्ताच्या नोंदीबाबत अनेकदा त्रयस्थ व्यक्तींकडून तक्रारी केल्या जातात. अशा तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आणि त्यांची पडताळणी करण्यासाठी विभागाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, जेणेकरून कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्याच्या महसुलात मोठा वाटा उचलणारा विभाग आहे. नागरिकांना या विभागाकडून असलेल्या अपेक्षा आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार यांचा समतोल राखण्यावर बावनकुळे यांनी भर दिला. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कामकाजाच्या गुणवत्तेवर होईल आणि पर्यायाने नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.