सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथे उभारण्यात येणारे भव्य स्मारक हे केवळ एक वास्तू नसून, ते समाजातील विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देणारे ऊर्जास्थान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या एकशे त्रेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या भव्य स्मारकाचे आणि महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि समाजात अनिष्ट रूढी-परंपरांचा पगडा होता, अशा कठीण परिस्थितीत सावित्रीबाईंनी बंड पुकारले. त्यांनी सुरू केलेली स्त्री शिक्षणाची चळवळ ही गुलामीच्या जोखडातून मुक्त करणारी क्रांती होती. स्मारकाच्या माध्यमातून हीच क्रांतीची बिजे नव्या पिढीत रुजवली जातील. येथे उभारण्यात येणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात महिलांना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी सर्व प्रकारचे आधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. आमचे सरकार महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या विचारांवर चालणारे आहे. म्हणूनच मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाच्या योजनेला आणि जन आरोग्य योजनेला आम्ही फुले दांपत्याचे नाव दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महाराष्ट्रात आतापर्यंत पन्नास लाख महिला लखपती दीदी झाल्या असून, या वर्षाअखेर ही संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. एकट्या सातारा जिल्ह्यात दीड लाख लखपती दीदी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नायगावचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावाने करण्याच्या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामसभेने तसा ठराव पाठवल्यास शासन त्याला विनाविलंब मान्यता देईल. संत सावता माळी यांचे अरण येथील स्मारक आणि महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगुण येथेही भव्य स्मारक उभारण्याचे काम शासन करणार आहे. या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यांनी १९९३ मधील आठवणींना उजाळा देत सांगितले की, एकेकाळी स्मारकासाठी तीस लाख रुपये उभे करणे कठीण होते, मात्र आज मुख्यमंत्र्यांनी एकशे त्रेचाळीस कोटींचा निधी दिला आहे. त्यांनी पुणे येथील फुले वाड्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची आणि मुंबईत आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभारण्याची मागणी केली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्मारकासाठी अतिरिक्त निधी आणि जागेच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात मान्यवरांनी महिला बचत गटांच्या स्टॉल्सना भेट दिली, तसेच स्मारकाच्या नियोजित संकल्पनेची चित्रफीत दाखवण्यात आली.