पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हफ्ता लवकरच जमा होणार

देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणाऱ्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत वीसावा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत एकोणीस हप्ते वितरित करण्यात आले असून आता वीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे.

या योजनेचा वीसाव्या हप्त्याचा लाभ जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या रकमेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा हप्त्याची रक्कम मिळणार नाही.

ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांनी ‘पंतप्रधान किसान’ योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला आधार क्रमांक व बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकरी इंटरनेट सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालयातूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

काही राज्यांमध्ये या योजनेतील चुकीचे खाते क्रमांक, अपात्र लाभार्थी, किंवा अपूर्ण माहितीमुळे पैसे अडकल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेत अद्ययावत करून खात्याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे उत्पन्न वाढवणे व शेतीतील खर्च भागवण्यास मदत करणे. त्यामुळे लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.






246 वेळा पाहिलं