सांगली-सोलापूरमधील शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता सरकारने आता आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील मार्गाचा नवीन आराखडा निश्चित केले जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुके आधीच वगळले गेले आहेत. आता सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि मिरज तालुक्यांतील गावांतून विरोध वाढल्याने, या भागातूनही महामार्ग वगळला जाण्याची शक्यता आहे.

कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, सांगलीवाडी या गावांतील शेतकरी विशेषतः महामार्गाला विरोध करत आहेत. त्यांचा दावा आहे की हा भाग पूरप्रवण असून, महामार्गामुळे सुपीक बागायती जमिनी व शेतीवर परिणाम होईल.

दरम्यान, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील काही गावांत जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा भाग नव्या आराखड्यात कायम ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या आराखड्यानुसार महामार्ग सावळजमार्गे रत्नागिरी-नागपूर महामार्गाशी जोडला जाऊ शकतो.






4,612 वेळा पाहिलं