
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी मुंबई पोलीस दलाने आज अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे. या ऐतिहासिक निवडणुकीसाठी आज शहरात सुमारे अठ्ठावीस हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक ही देशातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मानली जाते. आज दिवसभर दहा अतिरिक्त पोलीस आयुक्त, तेहत्तीस पोलीस उपायुक्त आणि चौ-याऐंशी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रत्यक्ष मैदानात उतरून सुरक्षेचा आढावा घेतील. तर मतदान केंद्रांवर तीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि पंचवीस हजारांहून अधिक पोलीस अंमलदार व होमगार्ड्स विविध मतदान केंद्रांवर तैनात आहेत. राज्य राखीव पोलीस बल, क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि रॅपिड कंट्रोल पोलीस देखील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी तैनात आहेत. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त सीसीटीव्ही देखरेख आणि सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. गुन्हे शाखेची पथके आणि साध्या वेशातील पोलीस देखील गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवून असतील, जेणेकरून मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे किंवा धमकावण्याचे प्रकार रोखता येतील.
यासोबतच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी मुंबईत सार्वजनिक वाहतुकीचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हजारो निवडणूक कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करणे हे मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या समन्वयाने परिवहन आराखडा तयार केला आहे. निवडणूक कामासाठी बेस्टने तब्बल एक हजार तेवीस बसेस राखून ठेवल्या आहेत. या बसेसचा वापर प्रामुख्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना नियुक्त केलेल्या केंद्रांपर्यंत पोहोचवणे, ईव्हीएम मशीन आणि इतर निवडणूक साहित्य सुरक्षितपणे केंद्रांवर नेणे, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साहित्यासह कर्मचाऱ्यांना संकलन केंद्रावर परत आणणे, या कामासाठी केला जात आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी मतदान केंद्रांच्या परिसरात बसेसच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात केल्या आहेत. मतदान साहित्याची ने-आण करणाऱ्या बसेसना प्राधान्य मिळावे म्हणून काही मार्गिका राखून ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या दिवशी इतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांची सोय निवडणूक कामासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्रांवर पोहोचताना कोणतीही अडचण येऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक बसवर निवडणूक कर्तव्य असे स्टिकर्स लावण्यात आले असून, प्रत्येक बसचा मार्ग आणि वेळ आधीच निश्चित करण्यात आली आहे.