बर्लिनमध्ये पन्नास हजार घरांचा वीजपुरवठा खंडित

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये शनिवारी एका महत्त्वाच्या विद्युत केबल लिंकला लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे पन्नास हजार घरांचा आणि दोन हजारहून अधिक व्यावसायिक संस्थांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ही आग अपघाती नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कडाक्याच्या थंडीत वीज गुल झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, दुरुस्तीसाठी बराच वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शनिवारी पहाटे साधारण पावणेपाचच्या सुमारास बर्लिनच्या नैऋत्येकडील लिख्टरफेल्डे भागातील टेल्टो कालव्यावर असलेल्या एका पुलावरील हाय-व्होल्टेज केबलला आग लागली. ही केबल जवळच असलेल्या वीज केंद्राला जोडलेली होती. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत अनेक महत्त्वाच्या केबल्स जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे केवळ घरेच नव्हे, तर स्थानिक व्यवसाय, मोबाईल टॉवर्स आणि लँडलाईन सेवांवरही परिणाम झाला आहे. बर्लिनची वीज पुरवठा करणारी कंपनी स्ट्रोमनेट्झ बर्लिनने स्पष्ट केले की, या आगीमुळे ग्रिडला मोठे नुकसान झाले असून वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बर्लिन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास राज्य पोलीस विभागाकडे सोपवला आहे, जो राजकीय हेतूने प्रेरित गुन्ह्यांचा तपास करतो. प्राथमिक पुराव्यांवरून ही आग मुद्दाम लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी सुमारे एकशे साठ अधिकारी तैनात केले असून पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्येही बर्लिनमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती, जिथे वीज खांबांना लक्ष्य करण्यात आले होते. त्या घटनेची जबाबदारी एका डाव्या विचारसरणीच्या गटाने स्वीकारली होती. या पार्श्वभूमीवर, सध्याची घटनाही एखाद्या गटाकडून पायाभूत सुविधांना धक्का पोहचवण्याचा प्रयत्न असू शकतो, असा संशय बळावला आहे.

सध्या बर्लिनमध्ये तापमान शून्याखाली असून सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे. अशा परिस्थितीत वीज गेल्यामुळे घरांमध्ये गरम राहण्यासाठी वापरली जाणारी हीटिंग सिस्टीम बंद पडली आहे. प्रशासनाने नागरिकांना खालील आवाहन केले आहे की, मोबाईल फोनचा वापर अत्यंत गरजेपुरता करावा जेणेकरून बॅटरी वाचवता येईल, टॉर्च आणि मेणबत्त्या तयार ठेवाव्यात, गरज पडल्यास तात्पुरत्या निवारा केंद्रात आश्रय घ्यावा. बर्लिनच्या आर्थिक व्यवहार मंत्री फ्रान्झिस्का गिफे यांनी या घटनेला अत्यंत गंभीर म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, यामध्ये केवळ घरेच नाही तर रुग्णालये, केअर सेंटर्स आणि सामाजिक संस्थांचाही समावेश आहे, ज्यांना वीज नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जळालेल्या केबल्स बदलणे हे एक आव्हानात्मक काम आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जमिनीखाली नवीन केबल्स टाकण्यात अडथळे येत आहेत. काही भागांत वीज येत्या काही तासांत येईल. मात्र, सुमारे पस्तीस हजार घरांना वीज मिळण्यासाठी आठ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या घटनेने जर्मनीच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. महत्त्वाच्या विद्युत वाहिन्या आणि पुलांसारख्या ठिकाणांवर अशा प्रकारे हल्ले होणे ही सुरक्षेतील मोठी त्रुटी मानली जात आहे. तपास यंत्रणा यामागील खरे सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेत असून बर्लिनमधील नागरिक सध्या काळोखात आणि थंडीत जीवन व्यतीत करत आहेत.






20,667 वेळा पाहिलं