राज्यातील अकरा रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजी विभागाचा विकास करणार

राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. स्पंदन डायग्नोस्टिक सेंटर सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार, आता राज्यातील अकरा शासकीय रुग्णालयांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर अत्याधुनिक रेडिओलॉजी विभागांचा विकास केला जाणार आहे.

राज्यातील सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना अनेकदा सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या महागड्या चाचण्यांसाठी खाजगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी सरकारने स्पंदन या प्रकल्पाची निवड केली आहे. या करारानुसार, रुग्णालयांच्या आवारातच जागतिक दर्जाच्या निदानाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील महत्त्वाच्या रुग्णालयांसह राज्यातील अकरा संस्थांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय, जी. टी. रुग्णालय, कामा आणि आल्ब्लेस रुग्णालय, आणि सेंट जॉर्जेस रुग्णालय आणि पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर आणि राज्यातील इतर सात प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांचा समावेश आहे. या करारानुसार, स्पंदन डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेडकडे या केंद्रांची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये केंद्राचे स्ट्रक्चरल डिझाइन आणि बांधकाम खाजगी संस्थेमार्फत केले जाईल. अत्याधुनिक मशिनरी आणि पायाभूत सुविधांसाठी लागणारा सर्व खर्च स्पंदन डायग्नोस्टिक करेल. टेस्ला एमआरआय, अत्याधुनिक सीटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड यांसारखी महागडी उपकरणे बसवली जातील. पुढील ठराविक वर्षांसाठी या उपकरणांचे संचालन आणि दुरुस्तीची जबाबदारी खाजगी संस्थेची असेल, ज्यामुळे मशीन बंद पडल्याने रुग्णांची होणारी गैरसोय टाळता येईल.

या प्रकल्पामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत पात्र असलेल्या रुग्णांना या सेवा पूर्णपणे मोफत मिळतील. इतर रुग्णांसाठी दर अत्यंत माफक असतील. रेडिओलॉजी रिपोर्ट तयार करण्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल, ज्यामुळे अचूक निदान होण्यास मदत होईल. सरकारी रुग्णालयांवरील कामाचा ताण कमी होऊन चाचण्यांचे रिपोर्ट जलद गतीने उपलब्ध होतील, ज्यामुळे उपचारांना विलंब होणार नाही.






3,802 वेळा पाहिलं