राज्यात ढगाळ हवामानाचे सावट – बागायतदार संकटात

राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत असून, अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी आणि बागायतदार कमालीचे धास्तावले आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंदावल्याने आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. ऐन थंडीच्या दिवसांत उकाडा वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत सध्या हापूस आंबा आणि काजूचा हंगाम सुरू होत आहे. झाडांना मोठ्या प्रमाणावर मोहर आला असून, त्याला पोषक थंडीची गरज असते. मात्र, ढगाळ हवामानामुळे आर्द्रता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर तुडतुड्यांचा हल्ला वाढण्याची दाट शक्यता आहे. बाष्पयुक्त हवेमुळे मोहरावर करपा आणि भुरी सारखे रोग पडू शकतात, ज्यामुळे मोहर काळा पडून गळण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रब्बी पिके सध्या जोमात आहेत. गव्हाला ओंब्या भरण्याच्या काळात थंडीची आवश्यकता असते. तापमान वाढल्यामुळे दाणे बारीक राहण्याचा किंवा पीक लवकर परिपक्व होण्याचा धोका आहे. ढगाळ हवामानामुळे हरभऱ्यावर घाटा अळीचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या अनेक ठिकाणी हरभरा फुलोऱ्यात किंवा घाटे धरण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना फवारण्यांचा खर्च वाढवावा लागणार आहे. कांदा उत्पादक पट्ट्यात म्हणजे नाशिक, अहमदनगर ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. टोमॅटो, वांगी आणि मिरची यांसारख्या फळभाज्यांवर बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात हे बदल झाले आहेत.

राज्याच्या अनेक भागांत किमान तापमान पंधरा ते अठरा अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे, जे सामान्य तापमानापेक्षा तीन ते चार अंशांनी जास्त आहे. पुढील तीन-चार दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर तात्काळ तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी. पिकांना हलके पाणी द्यावे, जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहील आणि तापमानातील बदलाचा फटका बसणार नाही. दररोज शेतात जाऊन पिकांचे बारकाईने निरीक्षण करावे, जेणेकरून कीड लागल्यास सुरुवातीच्या काळातच त्यावर नियंत्रण मिळवता येईल. शेतकऱ्यांची मेहनत आणि मोठा खर्च करून उभी केलेली पिके आता काढणीच्या उंबरठ्यावर असताना निसर्गाच्या या लहरीपणामुळे ग्रामीण भागात चिंतेचे ढग गडद झाले आहेत.






23,138 वेळा पाहिलं