त्र्यंबकेश्वरमध्ये स्वच्छ संकल्प अभियानाची दिमाखदार सुरुवात

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक राखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ संकल्प अभियानाचा शुभारंभ विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.

अभियानाचे उद्घाटन करताना डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने देश-विदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक त्र्यंबकेश्वरला भेट देतात. या जागतिक दर्जाच्या सोहळ्यासाठी शहराची स्वच्छता राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, त्यासाठी एकत्रित, नियोजनबद्ध आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, शिर्डी, शनिशिंगणापूर आणि सप्तशृंगी गड यांसारख्या मोठ्या देवस्थान परिसरांच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता कायम राखण्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे ठोस मॉडेल राबवले पाहिजे. तसेच, स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर संस्थान आणि नगर परिषदेला दिल्या.

अभियानाची सुरुवात एका भव्य शोभायात्रेने झाली. गजानन महाराज मंदिर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मीनारायण चौक ते गायत्री मंदिर या मार्गावर टाळ-मृदुंगाच्या गजरात ही यात्रा काढण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील विद्यार्थी आणि नागरिकांनी स्वच्छता हाच खरा धर्म असा संदेश देत शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ सरकारी यंत्रणाच नाही, तर साधू-महंत आणि विविध सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी पंचदशमान जुना आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वाण आखाडा, निरंजनी आखाडा, नया उदासिन आखाडा, निर्मल आखाडा आणि अग्नी आखाड्याच्या महंतांनीही स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थितांना माझी वसुंधरा शपथ दिली. नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. शपथेनंतर गौतमी घाट, संगम घाट, वेताळ महाराज मंदिर परिसर, निवृत्तीनाथ महाराज चौक आणि आवाहन आखाडा परिसर अशा पाच महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शहरातील शिक्षण संस्था आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिला बचत गट आणि स्थानिक स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आगामी कुंभमेळा स्वच्छ आणि हरित व्हावा, यासाठी त्र्यंबकेश्वरवासीयांनी घेतलेला हा संकल्प आता अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.






10,619 वेळा पाहिलं