बांगलादेशातील कापड उद्योग संकटात – फेब्रुवारीपासून सर्व सूत गिरण्या बंद

बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेला वस्त्रोद्योग सध्या एका ऐतिहासिक आणि गंभीर संकटात सापडला आहे. बांगलादेश टेक्सटाईल मिल्स असोसिएशनने एक फेब्रुवारी २०२६ पासून देशातील सर्व सूत गिरण्या अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि लाखो कामगारांच्या रोजगारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बांगलादेशमधील सूत गिरणी मालकांचा मुख्य आरोप भारताकडून होणाऱ्या शुल्कमुक्त धागा आयातीवर आहे. बांगलादेशचे तयार कपडे निर्यातदार स्वस्त दरात उपलब्ध होणारे भारतीय सूत मोठ्या प्रमाणात आयात करत आहेत. भारतीय सुताच्या किमती बांगलादेशातील स्थानिक सुतापेक्षा कमी असल्याने, स्थानिक गिरण्यांचा माल पडून आहे. सध्या स्थानिक गिरण्यांकडे सुमारे बारा हजार पाचशे कोटी बांगलादेशी चलनातील किमतीचा धागा पडून आहे. त्याला स्थानिक बाजारात खरेदीदार मिळत नसल्याने गिरण्या मोठ्या आर्थिक तोट्यात आहेत. हे संकट दूर करण्यासाठी आणि गिरण्या सुरू ठेवण्यासाठी असोसिएशनने सरकारकडे काही कठोर मागण्या केल्या आहेत. भारताकडून आयात होणाऱ्या दहा ते तीस काउंटच्या सुतावर तातडीने आयात शुल्क लादण्यात यावे, जेणेकरून स्थानिक सुताला स्पर्धेत टिकता येईल. सूत गिरण्यांना आवश्यक असलेला नैसर्गिक वायूचा पुरवठा अखंडित असावा आणि तो सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावा. वाढत्या बँक व्याजदरामुळे गिरणी मालकांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे, त्यात सरकारने दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी आहे.

एक फेब्रुवारीपासून या सर्व गिरण्या बंद झाल्या, तर त्याचे परिणाम केवळ उद्योगावरच नव्हे तर संपूर्ण देशावर होतील. या निर्णयामुळे कापड उद्योगातील सुमारे दहा लाखांहून अधिक कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. बांगलादेशच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल पंच्याऐंशी वाटा हा तयार कपड्यांचा आहे. सूत गिरण्या बंद पडल्यास या पुरवठा साखळीवर विपरित परिणाम होऊन देशाचे परकीय चलन कमी होऊ शकते. विशेष म्हणजे, बांगलादेशमध्ये आगामी बारा फेब्रुवारीला राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत. अशा महत्त्वाच्या काळात अर्थव्यवस्थेचा कणा असलेला उद्योग बंद पडणे हे शेख युनूस सरकारसाठी मोठे राजकीय आव्हान ठरणार आहे.






18,276 वेळा पाहिलं