
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आपल्या धोरणांमध्ये कमालीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात अमेरिकेने विविध श्रेणीतील एक लाखांहून अधिक व्हिसा रद्द केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, पर्यटक आणि व्यावसायिक व्हिसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या कारवाईचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश असून, आठ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार, २०२५ सालात व्हिसा रद्द करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. एक लाखांहून अधिक व्हीसा रद्द करण्यात आले असून ही आकडेवारी मागील प्रशासनाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी केवळ दोन हजार चारशेच्या आसपास विद्यार्थी व्हिसा रद्द झाले होते.
परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईमागे राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षा ही मुख्य कारणे असल्याचे म्हटले आहे. मद्यपान करून गाडी चालवणे, चोरी किंवा मारहाणीच्या प्रकरणांत अडकलेल्या व्यक्तींचे व्हिसा तातडीने रद्द करण्यात आले आहेत. विद्यापीठ कॅम्पसमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये सहभाग किंवा प्रक्षोभक घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. अमेरिकाविरोधी किंवा वादग्रस्त पोस्टमुळे अनेकांचे व्हिसा धोक्यात आले आहेत. निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या पर्यटकांचे आणि कर्मचाऱ्यांचे व्हिसा मोठ्या प्रमाणात रद्द झाले आहेत.
भारतासाठी ही बातमी धक्कादायक आहे कारण दरवर्षी लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. ऑगस्ट २०२५ च्या आकडेवारीनुसार, नवीन भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चव्वेचाळीस टक्के घट झाली आहे. व्हिसा वैध असूनही, अमेरिकेच्या विमानतळावर पोहोचल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थ्यांना ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ माघारी धाडल्याच्या घटना वाढल्या आहेत. एकदा व्हिसा रद्द झाला की पुन्हा नवीन व्हिसा मिळवणे अत्यंत कठीण असते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर आणि आर्थिक गुंतवणूक धोक्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. आम्ही केवळ कायद्याचे पालन करणाऱ्यांनाच देशात राहू देऊ, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले की, व्हिसा मिळवणे हा परदेशी नागरिकांचा हक्क नसून तो एक विशेषाधिकार आहे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास तो कधीही काढून घेता येतो. सध्याच्या कठीण परिस्थितीत अमेरिकेत असलेल्या किंवा जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर कोणतीही प्रक्षोभक किंवा राजकीय पोस्ट टाकू नका, स्थानिक आणि ट्रॅफिक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, व्हिसा नियमांनुसार किमान क्रेडिट्स पूर्ण करा, संशयास्पद वाटणाऱ्या कोणत्याही आंदोलनांपासून दूर राहा.