मुंबई – नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो आठला मंजुरी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या मेट्रो आठ मार्गिकेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे मुंबईतील सध्याचे विमानतळ आणि नवी मुंबईतील आगामी विमानतळ यांमधील अंतर अवघ्या तीस ते पंचेचाळीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.

राज्य सरकारने या मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावर मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची जबाबदारी सिडकोकडे सोपवण्यात आली असून, एमएमआरडीए आणि सिडको यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याचे पुनरावलोकन करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाच बड्या कंपन्यांनी यासाठी उत्सुकता दाखवली आहे. ही मार्गिका सुमारे पस्तीस किलोमीटर लांबीची असेल. सध्या या प्रवासासाठी दीड ते दोन तास लागतात. मात्र, मेट्रोमुळे हा प्रवास केवळ तीस ते चाळीस मिनिटांत पूर्ण होईल. या मार्गिकेवर एकूण वीस स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी दहा स्थानके नवी मुंबई परिसरात असतील. ही मार्गिका उन्नत आणि भुयारी अशा दोन्ही स्वरूपाची असेल. मुंबईतील भाग प्रामुख्याने भुयारी असण्याची शक्यता आहे, तर नवी मुंबईतील भाग उन्नत असेल.

मुंबई विमानतळावरून उतरणाऱ्या प्रवाशांना नवी मुंबई विमानतळ गाठणे आता अधिक सुलभ होईल. ही मार्गिका इतर मेट्रो मार्गिकांशीही जोडली जाणार आहे. सागर संगम स्थानकावर मेट्रो एक वर्सोवा-घाटकोपर आणि एस. बर्वे मार्ग येथे मेट्रो दोन-बी शी हे जोडलेले असेल. यामुळे संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे पंधरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सिडकोने या प्रकल्पासाठी वेगाने काम सुरू केले असून, आराखडा अंतिम झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. खासगी सहभागामुळे प्रकल्पासाठी लागणारा निधी उभा करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे सरकारला सोपे जाणार आहे. नवी मुंबईत ही मेट्रो वाशी, नेरुळ, सीवूड्स, बेलापूर अशा महत्त्वाच्या उपनगरांतून जाणार आहे. नेरुळमधील डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि सीवूड्समधील वंडर्स पार्क येथे महत्त्वाचे थांबे असतील. ही मार्गिका नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-दोन पर्यंत थेट पोहोचणार आहे.






20,763 वेळा पाहिलं