
रिसेप्सनिस्ट ते पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांचा थक्क करणारा प्रवास : पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती व कंपनीच्या संचालक मंडळातही त्यांचा समावेश करण्यात आल्याने गदगद झालेल्या इंद्रानूयी ही बातमी आपली आई, पती आणि दोन मुलींना सांगण्यास उत्सुक होत्या. त्यासाठी त्या लगेच घरी आल्या आणि आईला बघताच तुला एक गोड बातमी द्यायची असल्याचे सांगितले. मात्र, आईने त्याकडे लक्ष न देता दुसऱ्या दिवशीसाठी दूध आणण्यास सांगितले. यामुळे नाराज झालेल्या इंद्राने दूध तर आणले, परंतु मी पेप्सीकोची सीईओ झाल्याचे वृत्त तुला का ऐकायचे नव्हते? असे त्यांनी आईला विचारले. इंद्राच्या आईने दिलेले उत्तर खूपच मार्मिक होते. “तू भलेही कंपनीच्या संचालक मंडळावर असशील. परंतु, घरात प्रवेश केल्यावर तू पत्नी, मुलगी, सून आणि आई आहेस, हे विसरू नकोस. तू हे सर्वकाही आहेस. ही जागा इतर कुणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीमधील मान सन्मान गॅरेजमध्येच ठेव आणि घरात काहीच आणत जाऊ नकोस’, हे आईने तेव्हा उच्चारलेले शब्द इंद्रायांच्या मनावर कायमचे कोरले गेले.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. असे नेहमीच बोलले जाते. यशस्वी पुरुषाच्या वाटचालीत एक स्त्री आई, पत्नी किंवा इतर कोणत्याही रूपात खंबीरपणे उभी असते असा त्याचा अर्थ. मात्र, एक शिक्षित व स्वावलंबी महिला आपली प्रतिभा, जिद्द आणि स्वबळावर यशाला गवसणी घालू शकते. भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी यांनी आपल्या कर्तृत्वानं हे सिद्ध करून दाखवलं आहे. कधी काळी आपले शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने पैसा कमावण्यासाठी मध्यरात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत रिसेप्सनिस्ट म्हणून काम करणाऱ्या इंद्रा नूयी आज १३१ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या आणि जगातील चौथ्या सर्वात मोठ्या कंपनीच्या सीईओ आहेत. त्यांच्या या अफाट कर्तुत्वामुळेच इंद्रा नूयी यांचा जगातील शक्तिशाली महिलां पैकी एक म्हणून उल्लेख केला जातो. शीतपेयांच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या पेप्सिको कंपनीच्या सीईओ असलेल्या इंद्रा नूयी यांनी नुकताच म्हणजे २८ ऑक्टोबरला आपला वाढदिवस साजरा केला.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात समाजात कमी जास्त प्रमाणात लिंगभेद हा केलाच जातो. मात्र, इंद्रा नूयी यांनी आपल्या थक्क करून टाकणाऱ्या प्रवासातून एक आदर्श घालून दिला आहे. तुम्ही कुठे आहात आणि कुठून आला आहात ? याला काहीही महत्त्व नसून, तुमच्याकडे स्वप्न असेल तर ते साध्य करण्यासाठी प्रबळ इच्छा शक्ती आणि निष्ठेची गरज असते. हेच नूयी यांच्या यशावरून स्पष्ट होते. भारतातील सध्याच्या चेन्नई आणि तेव्हाच्या मद्रास शहरातील एका पुराणमतवादी तामिळ कुटूंबात २८ ऑक्टोबर १९५५ रोजी इंद्रा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये कार्यरत होते. इंद्रा यांचे शालेय शिक्षण मद्रास येथील होली अँन्जेल्स अँग्लोइंडियन हायर सेकंडरी स्कूल येथे पार पाडले. इंद्रा यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित याविषयांमध्ये पदवी प्राप्त केली. वडील बँकेत असल्याने आईनेच इंद्रा आणि इतर बहिणींचे पालन पोषण केले. मोठ्या झाल्यावर तुम्ही काय होणार? असा प्रश्न आई मुलींना विचारत असे आणि सर्वोत्तम उत्तर देणाऱ्याला बक्षीस. यामुळेच आपल्या भविष्यातील वाटचालीचा विचार करण्याची प्रेरणा इंद्राला मिळाली. निर्धार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर इंद्राने आताच्या कोलकाता आणि तत्कालीन कलकत्ता शहरातील अत्यंत प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. त्यानंतर इंद्राने दोन वर्षे भारतातच जॉन्सन व मेट्टूर बर्डसेल या कंपन्यांमध्ये नोकरी केली.

यामधून कमावलेल्या थोड्या फार पैशांसह इंद्राने उच्चशिक्षणासाठी अमेरिकेकडे प्रयाण केले. याले येथे उच्चशिक्षण घेत असताना आपला खर्च भागविण्यासाठी इंद्रा मध्यरात्रीपासून ते पहाटे पाचवाजेपर्यंत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायच्या. या संघर्षादरम्यान याले इथे मास्टर्स पूर्ण केल्यानंतर कमावून बचत केलेल्या पैशातून आपल्या पहिल्या मुलाखतीसाठी त्यांनी एक पाश्चिमात्य सूट खरेदी केला. परंतु, यावेळी तिने गुडघ्यापर्यंत येईल एवढा ट्राऊझर परिधान केल्यामुळे मुलाखतीत इंद्राला नाकारण्यात आले. यामुळे नाराज इंद्रा यालेमधील आपल्या प्राध्यापकांकडे गेल्या असता, तुला जे योग्य वाटेल ते परिधान कर. असा सल्ला त्यांनी इंद्राला दिला. त्यानंतर इंद्रा पुढच्या मुलाखतीला साडी नेसून पारंपरिक भारतीय पोशाखात मुलाखतीसाठी गेली. आणि आश्चर्य म्हणजे तिला नोकरी मिळाली. तुम्ही कायपरिधान करता यापेक्षा तुम्ही काय आहात याला जास्त महत्त्व आहे. हे या घटनेवरून सिद्ध होते.
या घटनेनंतर इंद्राने ‘बीईंगयुव्हरसेल्फ’ म्हणजे आपण जे काही आहोत ते आहोत, याच विचारधारेच्या आधारे मार्गक्रमण सुरुकेले. त्यानंतर इंद्राने बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये कामास सुरुवात केली. त्याठिकाणी तिला कठोर परिश्रम करावे लागलेआणि परिश्रमाशी कोणतीही तडजोड न करण्याची इंद्रा दोन कारणं सांगतात. एकतर मी महिला व त्यामुळे आपले कर्तृत्त्व सिद्धकरण्यासाठी पुरुष सहकाऱ्यांपेक्षा अधिक काम करणे आणि दुसरे म्हणजे अमेरिकन नसणे. सहा वर्षानंतर इंद्रा यांनी मोटोरोला कंपनीमध्ये उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अँण्ड प्लांनिंग विभागाचे संचालक पद स्वीकारले. त्यानंतर चार वर्षे एसी ब्राऊन बोव्हेरी या झूरिचस्थित औद्योगिक कंपनीच्या अमेरिकेतील व्यवसायात उच्च व्यवस्थापनात काम केल्यानंतर १९९४ साली इंद्रा नूयी यांनी पेप्सिको कंपनी जॉईन केली.पेप्सिको कंपनीत अथक परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर इंद्राने अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. अनेकदा त्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागे. या परिश्रमाचेच फळ त्यांना मिळाले आणि २००० साली त्यांची पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. शिवाय कंपनीच्या संचालक मंडळातही त्यांचा समावेश करण्यात आला.
एक महिला आणि त्यातही गैर अमेरिकन महिलेला अशा सर्वोच्च शिखरावर पोचणे हे खरतर खूपच खडतर काम होते. या दरम्यान कामाच्या ठिकाणी होणारे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भेदाचे सर्व अत्याचार इंद्रा यांनी सहन केले. कामकाजी महिला असणे हे वाटतं तितकं सोपं नाही आणि इंद्रा नुयी यांनाही ते चांगले ठाऊक आहे. मात्र, आपण एक उत्तम पत्नी,आई, मुलगी आणि या सोबतच मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळविणारी कामकाजी महिलासुद्धा होऊ शकते. हे इंद्रा नुयी यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच इंद्रा नुयी यांचा जीवन प्रवास जीवनात खरोखरच काहीतरी साध्य करून भरारी घेण्यास उत्सुक असण्यासह कामकाजाच्या ठिकाणी सहन कराव्या लागणाऱ्या गॊष्टींचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने खरोखरच प्रेरणादायी आहे. एक महिला तिच्या इच्छेनुसार कोणतीही गोष्ट साध्य करूश कते. हेच इंद्रा यांच्या यशस्वी जीवनावरून स्पष्ट होते.