
रत्नागिरी शहरात स्थित असलेला थिबा राजवाडा ही एक ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वास्तू आहे. ब्रिटीश राजवटीने बर्मा, जे सध्या म्यानमार म्हणून ओळखले जाते. येथील राजा थिबा मिन याला नजरकैदेत ठेवण्यासाठी हा राजवाडा बांधला होता. हा राजवाडा राजा थिबाच्या शोकांतिकेचा आणि भारतामध्ये आलेल्या एका परदेशी राजघराण्याच्या हद्दपारीचा साक्षीदार आहे.
थिबा मिन हा म्यानमारचा शेवटचा राजा होता. १८८५ मध्ये तिसऱ्या इंग्रज-बर्मी युद्धात ब्रिटिशांनी त्याचा पराभव केला आणि त्याला सिंहासन सोडावे लागले. स्वकियांपासून पूर्णपणे अलग ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी राजा थिबाला त्याच्या कुटुंबियांसह थेट रत्नागिरी येथे नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला. १६ एप्रिल १८८६ रोजी तो रत्नागिरीत दाखल झाला. सुरुवातीला त्याला धरणगाव येथील एका बंगल्यात ठेवण्यात आले होते. राजाच्या मागणीनुसार, ब्रिटिशांनी १९१० मध्ये रत्नागिरी शहरात सत्तावीस एकर जागेवर एक लाख सदतीस हजार रुपये खर्चून हा भव्य राजवाडा बांधला. १९११ पासून १९१६ मध्ये राजाच्या मृत्यूपर्यंत त्याचे आणि राणीचे वास्तव्य याच राजवाड्यात होते.
राजा थिबाच्या मृत्यूनंतर हा राजवाडा पुरातत्व खात्याच्या ताब्यात आला. सध्या येथे प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या संग्रहालयात राजा थिबाने वापरलेल्या वस्तू, कपडे आणि त्याच्या जीवनातील काही आठवणी जतन करून ठेवलेल्या आहेत. म्यानमारमधील नागरिक आणि उच्चपदस्थ व्यक्ती वेळोवेळी या राजवाड्याला भेट देण्यासाठी येतात, ज्यामुळे या ठिकाणाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व टिकून आहे.
थिबा राजवाडा ब्राह्मी आणि युरोपीयन स्थापत्यशैलीचा संगम दर्शवतो. राजवाडा तीन मजली असून, त्याची रचना अतिशय आकर्षक आहे. राजवाड्याच्या दर्शनी भागाचा लाल रंग आणि छतावरील मंगलोरी कौले दूरूनच लक्ष वेधून घेतात. या संरचनेचे मुख्य आकर्षण म्हणजे सुंदर कोरीव काम केलेल्या लाकडी खिडक्या तसेच लाकडी तुळ्या, खांब आणि सज्जे यांवर केलेले सुतारकाम अप्रतिम आहे. पहिल्या मजल्यावर संगमरवरी मजला असलेला एक प्रशस्त नृत्य कक्ष आणि मोठे दरबार सभागृह आहे, जे तत्कालीन राजेशाही थाटाची कल्पना देते. हा राजवाडा एका विस्तीर्ण कातळावर वसलेला आहे, जिथून अरबी समुद्राचे आणि शेजारच्या भाट्ये खाडीचे विलोभनीय दृश्य दिसते. राजवाड्याच्या गच्चीवरून दिसणारा समुद्रकिनारा हा या वास्तूच्या सौंदर्यात भर टाकतो. राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्थापित केलेली आहे, जी राजा थिबा यांनी भारतात आणली होती, असे मानले जाते.
यापासून जवळच असलेला थिबा पॉईंट हे रत्नागिरीतील एक सुंदर पाहण्यासारखे ठिकाण आहे. हा पॉईंट थिबा राजवाड्याच्या जवळच आहे. या ठिकाणाहून समुद्राचे, भाट्ये खाडीचे आणि रत्नागिरी शहराच्या काही भागांचे नयनरम्य दृश्य दिसते. थिबा पॉईंट हे मुख्यतः सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण येथून क्षितिजावर मावळणाऱ्या सूर्याचे दृश्य खूपच विलोभनीय असते.
थिबा राजवाडा आणि थिबा पॉईंट हे दोन्ही रत्नागिरीतील महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळे असून, ते ऐतिहासिक आठवणी आणि कोकण किनारपट्टीच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देतात.