साताऱ्यातील ठोसेघर धबधबा

पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्यावर डोंगरांच्या उंच कपारीतून जमिनीच्या दिशेने झेपावणारे सफेदशुभ्र धबधबे दिसतात. अर्थातच, धबधब्यांचे आकर्षण प्रत्येकाला असते. धबधब्यांखाली मनमुराद आंघोळ करण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत, जे माणसांची गर्दी खेचून आणतात. पावसाळी पर्यटन हंगामात या धबधब्यांवर गर्दी होते. कास पठारासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात ठोसेघर धबधबा आहे, जो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवितो.

पावसात फिरण्यासाठी सातारा हे एक उत्तम ठिकाण आहे. ठोसेघर धबधबा बघायला गेल्यास त्याच वेळी या जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला, कास पठार, भांबवली धबधबा अशी अन्य मनमोहक ठिकाणे पहायला मिळतात. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना माणूस अक्षरश: बेभान होतो. येथील रंगीबेरंगी रानफुले मन मोहित करतात. याठिकाणी दोन धबधबे आहेत. एक ११० मीटर उंचीवरून कोसळणारा आणि दुसरा साधारण ३५० मीटर उंचावरून कोसळणारा धबधबा आहे. हा धबधबा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. हा धबधबा बघण्यासाठी येथे निरीक्षण मनोरा बांधलेला आहे. तेथून धबधब्याची वेगवेगळी रुपे पहायला मिळतात.

ठोसेघर धबधबा साताऱ्यापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यांत हा धबधबा कोसळत असतो. या धबधब्याचे पाणी अतिशय स्वच्छ असते. या धबधब्याकडील निसर्गसंपदा मस्त अनुभूती देते. हा धबधबा पाहण्यासाठी जाताना सुरुवातीला प्रवेशद्वार लागते. आत गेल्यावर निसर्ग माहिती केंद्र मिळते. या केंद्रावर सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नैसर्गिक ठिकाणांची माहिती प्रोजेक्टरद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते. धबधब्याच्या मागे गुहा असून तीसुद्धा मनाला आनंद देणारी आहे. हा धबधबा महाबळेश्वरपासून ७७ किलोमीटर, पुण्यापासून १४० व मुंबईपासून २९० किलोमीटर अंतरावर आहे. ठोसेघर धबधब्याला पर्यटक आवर्जुन भेट देतात. हा धबधबा पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती शुल्क आकारले जाते.