शेतमालाची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात संशोधनाधारित बियाण्यांवर भर

जागतिक स्तरावर होत असलेल्या हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर दिसून येत आहे. अनियमित पाऊस, वाढते तापमान आणि बदलत्या ऋतुपद्धतीमुळे पारंपरिक बियाण्यांची कार्यक्षमता कमी होत असून, नव्या परिस्थितीला प्रतिकार करू शकणाऱ्या संशोधित बियाणांची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल तर बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने बियाण्यांमध्ये सातत्याने संशोधन आणि त्यांचा योग्य वापर होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे–कुर्ला संकुल येथे आयोजित जागतिक बी-बियाणे उद्योगाच्या ‘आशियाई बियाणे अधिवेशन 2025’ या कार्यक्रमाला मंत्री रावल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच बियाणे क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिनिधींची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. या प्रसंगी बोलताना रावल यांनी महाराष्ट्राने कृषी नवोन्मेष आणि बियाणे उद्योगविकास या दोन्ही क्षेत्रांत कायम अग्रक्रम राखला आहे, असे सांगितले.

रावल यांनी स्पष्ट केले की बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहत आहेत आणि त्यावर उपाय म्हणून वैज्ञानिक पद्धतीने तयार झालेल्या संशोधित बियाण्यांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. राज्य शासन भविष्यातही अशा बियाणे उत्पादक संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करणार असून संशोधन क्षमता वाढवण्यावरही भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतमालाची उत्पादकता वाढवण्यासाठी उच्च प्रतीच्या बियाण्यांचा वापर अधिकाधिक प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. बनावट बियाण्यांच्या विरोधात कठोर कारवाई, दंडात्मक तरतुदी तसेच बियाणे उद्योगातील पारदर्शकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक सुधारणा राबविण्यात येत असल्याचे रावल यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनासाठी हमीभाव आणि योग्य बाजारपेठ मिळवून देणे, तसेच आधुनिक प्रक्रिया उद्योगांना चालना देणे या दिशेने राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे.

दोन दशकानंतर भारतात होत असलेल्या या आशियाई बियाणे अधिवेशन 2025 मध्ये देशातील शंभरहून अधिक बियाणे कंपन्यांसह आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि संशोधक सहभागी झाले आहेत. भारतातील बियाणे क्षेत्राला जागतिक पातळीवर अधिक भक्कम स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे ठरत असल्याचे मत आयोजक संस्थांनी व्यक्त केले. नॅशनल सीड्स असोसिएशन ऑफ इंडिया, एशिया पॅसिफिक सीड्स संघटना आणि फेडरेशन ऑफ सीड्स इंडस्ट्री ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम पार पडत आहे.






6,758 वेळा पाहिलं