
भारतीय चित्रपटसृष्टीत समाज, धर्म, स्त्री-पुरुष समानता आणि न्यायव्यवस्था या विषयांवर आधारित चित्रपटांची संख्या अत्यल्प आहे. अशाच काही ठळक आणि अर्थपूर्ण सिनेमांपैकी एक ठरणारा चित्रपट म्हणजे ‘हक’. येत्या दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा केवळ कथानकापुरता मर्यादित नाही तर एका स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या अधिकाराचा आणि समाजाने लादलेल्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या शक्तीचा जिवंत आवाज आहे. सुपर्ण वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली आणि जंगली पिक्चर्स, इन्सोम्निया फिल्म्स तसेच बावेजा स्टुडिओज यांच्या संयुक्त निर्मितीत हा चित्रपट साकारला असून मुख्य भूमिकांमध्ये यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांच्या प्रभावी जोडीचा समावेश आहे.
या चित्रपटाची कथा शाझिया बानो या सामान्य मुस्लिम स्त्रीभोवती फिरते. शाझिया आपल्या पती अहमद खान सोबत साधं, शांत आयुष्य जगत असते. मात्र तिचं आयुष्य एका क्षणात बदलून जातं जेव्हा अहमद तिला सोडून जाण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर शाझिया समाज, धर्म आणि कायदा या तिन्ही आघाड्यांवर न्यायासाठी उभी राहते. तिचा संघर्ष फक्त स्वतःच्या आयुष्यासाठी नसतो तर त्या सर्व स्त्रियांसाठी असतो ज्यांचा आवाज काळ आणि प्रथा यांनी दाबून ठेवला आहे.
‘हक’चा मूळ गाभा सुप्रसिद्ध शाह बानो प्रकरणावरून प्रेरित आहे. या ऐतिहासिक घटनेने भारतात स्त्रियांच्या अधिकारांविषयी धार्मिक कायद्यांच्या मर्यादांविषयी आणि न्यायव्यवस्थेतील समतेविषयी मोठी चर्चा रंगली होती. या चित्रपटात हाच संघर्ष नव्या काळाच्या पार्श्वभूमीवर साकारला आहे. पण ह्या चित्रपटात प्रश्न उभा राहतो न्याय म्हणजे नेमकं काय? धर्म आणि कायदा यांच्या सीमेवर स्त्रीचा खरा हक्क कुठे उभा आहे?
यामी गौतम हिने शाझियाच्या भूमिकेतून एक धाडसी, आत्मसन्मान जपणारी आणि निर्धाराने जगणारी स्त्री साकारली आहे. तिच्या नजरेतून उमटणारी वेदना, राग आणि ठामपणा प्रेक्षकांच्या मनात घर करतो. इमरान हाश्मीने साकारलेला अहमद खान हा पात्र गुंतागुंतीचा असून समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेचं प्रतिबिंब दाखवतो. या दोघांमधील न्यायालयीन संवाद आणि भावनिक संघर्ष हे चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांनी या विषयाला संवेदनशील आणि वास्तवदर्शी पद्धतीने सादर केलं आहे. प्रत्येक दृश्यात सत्याचा शोध, प्रत्येक संवादात प्रश्न आणि प्रत्येक भावनेत एक संघर्ष जाणवतो. छायाचित्रण, पार्श्वसंगीत आणि अभिनय यांचा सुंदर संगम या चित्रपटाला अधिक प्रभावी बनवतो.
‘हक’ हा केवळ स्त्री-पुरुष समानतेबद्दलचा सिनेमा नाही, तर मानवी हक्कांचा आणि आत्मसन्मानाचा जिवंत दस्तऐवज आहे. नोव्हेंबर महिन्यात अनेक मनोरंजनप्रधान चित्रपट प्रदर्शित होणार असले तरी ‘हक’ हा सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि विचारांना चालना देणारा सिनेमा ठरेल. एकूणच ‘हक’ हा भावनिक, प्रबोधनात्मक आणि अर्थपूर्ण असा सिनेमा आहे जो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. “न्याय फक्त कायद्यात आहे की तो प्रत्येकाच्या अंतःकरणातही असायला हवा?” आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस कितपत उतरतो हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे.