संत जनाबाईंची समाधी

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात श्री विठ्ठलाची परमभक्त संत जनाबाईंचे समाधीस्थान आहे. अनेक भाविकांची पावले यादिशेने वळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरीच्या काठावर हे सुंदर समाधी मंदिर आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड हा एक तालुका आहे. गोदावरीच्या तीरावर शांतपणे विसावलेला हा तालुका म्हणजे संत जनाबाईचे जन्मस्थान आहे. गंगाखेड येथे संत जनाबाईंचे मंदिर असून आणखीही काही छोटी-मोठी देवालये आहेत. या गावाला प्राचीनतेचा इतिहास आहे. अनेक जुन्या घरांचे, राजवाड्यांचे अवशेष येथे आढळतात. येथील जुनी घरे दगडांनी बांधलेली वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आता अलीकडे नवनवीन बांधकामे येथे होत आहेत.

गंगाखेड शहरातील ग्यानु मामा यांची अवीट गोडीची कलम मिठाई फार प्रसिद्ध आहे. येथील लोक कोणत्याही कार्यक्रमासाठी दुसऱ्या कुठल्याही मिठाईपेक्षा ही मिठाई आवडीने खरेदी करतात. या तालुक्यात संत जनाबाई महाविद्यालय आहे. येथेच मन्मथ स्वामी यांचेही मोठे मंदिर आहे. परळीपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेला हा तालुका ‘दक्षिण काशी’ म्हणूनही सुप्रसिद्ध आहे.

गंगाखेडला सोमवार गेल्यास आपल्याला सोमवार बाजार पहायला मिळेल, जो प्रसिद्ध आहे. या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात. संपूर्ण तालुक्यातील लोक यादिवशी गंगाखेड येथे जमा होतात. संत जनाबाईंच्या मदतीसाठी, तिचे दळणकांडण करण्यासाठी धावून जाणाऱ्या पांडुरंगाचे भक्त गंगाखेडला दर्शनासाठी आवर्जून जातात.