
‘तोरणमाळ’ हे भारतातील नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे. अतिदुर्गम भागात असल्याने आणि जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते. उंची आणि भौगोलिक वातावरणाने येथील नैसर्गिक सौंदर्य व सुखकारक हवामान अधिकच खुलते. तोरणमाळला ‘गोरक्षनाथांचे मंदिर’ आहे. महाशविरात्रीला मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख भक्त दर्शनासाठी येतात. तसेच 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तोरणमाळच्या उंच ठिकाणाहून एकच रस्ता सात वेळा वळताना दिसतो. हा रस्ता पायऱ्यांप्रमाणे दिसतो. त्यामुळे याला ‘सात पायऱ्यांचा घाट’ असे म्हटले जाते.
तोरणमाळ हे एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण असून येथे यशवंत तलाव, सीता खाई दरी, नैसर्गिक सौंदर्य, डोंगर – दरी, धबधबे इत्यादी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. ‘सीता खाई’ हे ठिकाण तोरणमाळपासून साधारण 3 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी एक भव्य दरी असून जवळच एक धबधबा आहे.
‘कमळ सरोवर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कमळ तलावावर एक रमणीय दृश्य आहे. हे ठिकाण सुंदर कमळाच्या फुलांनी झाकलेले आहे. या सरोवरातून निघणारा एक प्रवाह ‘सीता खाई’ मध्ये वाहतो. या पाण्याच्या प्रवाहाने बनलेली अद्भुत झलक पर्यटकांना भुरळ घालते.
‘यशवंत तलाव’ हा 1.59 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारा एक भव्य नैसर्गिक तलाव आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावापासून या तलावाला ‘यशवंत’ हे नाव पडले आहे. पर्यटकांना तलावामध्ये नौकाविहार आणि मासेमारी करता येते. ‘मच्छिंद्रनाथ गुहा’ ही नैसर्गिकरित्या तयार झालेली असून येथे संत मच्छिंद्रनाथ ध्यानस्थ असल्याचे म्हटले जाते. या गुहेच्या परिसरात ‘मच्छिंद्रनाथ मंदिर’ आणि ‘ऋषी मार्केंडयांचे आसन’ पाहायला मिळते.
‘खडकी पॉईंट’ हे येथील मुख्य ठिकाण आहे. ते पर्यटकांना खूप आकर्षित करते. तोरणमाळमधील लोकप्रिय ट्रेकिंग क्षेत्र याच ठिकाणी आहे. येथे एक ‘तोरणा देवीचे मंदिर’ आहे. स्थानिक लोकांच्या मते, हे मंदिर 600 वर्षापेक्षा जुने आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती तोरणा देवीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळ्या पाषाणातून कोरलेली आहे.
येथे उन्हाळ्यात देखील पाऊस होत असतो. यामुळे ऑक्टोबर ते मे महिन्यात तोरणमाळ फिरायला येण्यासाठी उत्तमकाळ आहे. तोरणमाळला पोहोचण्यासाठी राज्य परिवहनाच्या बस आणि खाजगी गाड्याही उपलब्ध आहेत.
तोरणमाळमध्ये राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय आहे. स्वादिष्ट आणि मसालेदार महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवणही मिळते. विशेषतः तूर, मका, गहू आणि ज्वारी यांपासून बनवलेले पदार्थ येथे प्रसिद्ध आहेत.