मालवणकडे पर्यटकांची पाठ – व्यावसायिक चिंतेत
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या मालवणच्या पर्यटन क्षेत्राला यंदा अनपेक्षित फटका बसला आहे. नेहमी गजबजलेल्या मालवणमध्ये यंदा पर्यटकांचा ओघ कमालीचा रोडावल्याने पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कोकणची काशी समजले जाणारे मालवण आणि येथील तारकर्ली, देवबाग सारखे समुद्रकिनारे दरवर्षी डिसेंबर अखेरीस पर्यटकांनी हाऊसफुल्ल असतात. मात्र, यंदाची स्थिती काहीशी वेगळी आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात मालवणमधील सर्व हॉटेल्स, होमस्टे आणि रिसॉर्ट्स महिनाभर आधीच बुक असतात. मात्र, यंदा ३१ डिसेंबरच्या दिवशीही अनेक ठिकाणची निवासस्थाने रिकामी असल्याचे चित्र आहे. पर्यटकांच्या या कमी उपस्थितीमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या पर्यटन हंगामाला मोठा ब्रेक लागला आहे.
पर्यटन तज्ज्ञ आणि स्थानिकांच्या मते, काही व्यावसायिक हंगामाचा फायदा घेण्यासाठी निवास आणि जेवणाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवतात. याचा नकारात्मक संदेश पर्यटकांमध्ये गेल्याने अनेकांनी इतर पर्यायांचा विचार केला. वाढत्या गर्दीच्या तुलनेत रस्ते, पार्किंग आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये झालेली दप्तरदिरंगाई पर्यटकांना त्रासदायक ठरत आहे. पर्यटकांचा कल आता गोवा किंवा दक्षिण कोकणातील कमी गर्दीच्या आणि स्वस्त असणाऱ्या इतर समुद्रकिनाऱ्यांकडे वळला आहे.
मालवणची मुख्य ओळख असलेल्या स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्स व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. एका दिवसात हजारो पर्यटक डायव्हिंगचा आनंद घेतात, पण यंदा ही संख्या निम्म्यावर आली आहे. किनाऱ्यावर पर्यटकांच्या प्रतीक्षेत असलेल्या बोटी आणि रिकामे स्टॉल्स यामुळे स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मालवणमधील हॉटेल व्यावसायिकांच्या मते, यंदाच्या हंगामात केवळ सुट्टीच्या दिवशी गर्दी दिसून आली, मात्र सलग सुट्ट्या असूनही ३१ डिसेंबरला अपेक्षित गर्दी झाली नाही. मालवणचा व्यापार हा प्रामुख्याने पर्यटन हंगामावर अवलंबून असतो. जर मुख्य हंगामातच अशी स्थिती राहिली, तर वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांमुळेही अनेक पर्यटक मालवण शहरात येण्याचे टाळत आहेत. पर्यटनाला शिस्त लावण्यासाठी आणि दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहे, असे मत पर्यटकांनी व्यक्त केले आहे.