
दिल्लीमध्ये वाढत्या विषारी धुके आणि प्रदुषित हवेमुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये सुमारे साठ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. हवेतील कण रासायनिक वायू, धूळ आणि इतर प्रदूषकं डोळ्यांवर विपरीत परिणाम करत आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
दिल्लीमध्ये दिवाळीनंतर हवा प्रदूषण पातळी गंभीर श्रेणीत नोंदवली गेली होती. याचे परिणाम आता समोर येत आहेत. लोकांना श्वसनाचे त्रास होण्याबरोबरच डोळ्यांचे वेगवेगळे आजारही होत आहेत. यावर डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की, डोळे लाल होणे, खाज सुटणे, जळजळ होणे, जास्त पाणी येणे अशा तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
हिवाळ्यातील थंड हवामानामुळे धुके जास्त होते आणि हवेत प्रदूषणाचे स्तर वाढतात. प्रदूषित हवेत असलेले लहान धुळीचे कण आणि रासायनिक वायू डोळ्यांच्या पृष्ठभागावर बसतात, अशा पद्धतीने डोळ्यांवरील पाण्याचा थर बाधित होतो व खाज सुटते, डोळ्यातून पाणी येवू लागते. ज्यांना आधीपासून उष्णतेने किंवा कोरड्या हवेमुळे त्रास होतो, त्यांचा त्रास वाढला आहे. संवेदनशील डोळे असलेल्या लोकांसाठी हा त्रास अधिक गंभीर ठरत आहे.
या पार्श्वभूमिवर डॉक्टरांनी काही सूचना नागरिकांना दिल्या आहे. रात्री किंवा सकाळच्या वेळेत प्रदूषण अधिक असू शकते. प्रदूषणाच्या काळात बाहेर जाणे टाळावे. संवेदनशील लोकांनी खासकरुन लहान मुले, वाहतूक पोलिस, वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी. डोळे स्वच्छ पाण्याने धुणे, आयड्रॉप्स वापरणे आणि सुरक्षित चष्म्याचा उपयोग करणे फायदेशीर आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास का त्रास दीर्घकालीन समस्या बनू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.