पिंपरी – चिंचवडमध्ये सीसीटिव्हीच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवणार
पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि गर्दीचे नियोजन अधिक सक्षम होणार आहे. पिंपरी-चिंचवड हे आशियातील महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचे प्रश्न लक्षात घेता, केवळ मानवी बळावर निगराणी करणे कठीण झाले होते. यावर उपाय म्हणून पोलीस आयुक्तांनी तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट पोलीसिंगचा हा प्रस्ताव मांडला होता.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिकेने आधीच बसवलेले सुमारे तीन हजार तीनशेहून अधिक कॅमेरे आता एकाच मध्यवर्ती प्रणालीशी जोडले जातील. ज्या भागात अद्याप कव्हरेज नाही, अशा महत्त्वाच्या ठिकाणी नवीन हाय-टेक कॅमेरे बसवले जातील. हे कॅमेरे केवळ चित्रीकरण करणार नाहीत, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संशयास्पद हालचालींची स्वतःहून ओळख पटवतील. या प्रकल्पामुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांना मोठे यश मिळणार आहे. फरार आरोपी किंवा संशयास्पद व्यक्ती गर्दीत दिसल्यास यंत्रणा तत्काळ नियंत्रण कक्षाला सावध करेल. चाकण, तळेगाव आणि भोसरी या औद्योगिक पट्ट्यांसह हिंजवडी आयटी पार्कमध्ये विशेष निगराणी असेल. यामुळे महिला सुरक्षितता आणि कामगारांच्या प्रवासादरम्यानची सुरक्षा वाढेल. आळंदी आणि देहू यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये पालखी सोहळ्यावेळी होणाऱ्या लाखोंच्या गर्दीचे व्यवस्थापन करणे या ‘एआय’ प्रणालीमुळे सोपे होईल.
शहरात वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे एखाद्या चौकात गर्दी वाढल्यास यंत्रणा सिग्नलच्या वेळेत बदल सुचवतील. विनाहेल्मेट, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे किंवा ट्रिपल सीट जाणाऱ्यांवर आपोआप ई-चलन फाडले जाईल. चोरीच्या गाड्या किंवा नियम तोडणाऱ्या गाड्यांच्या नंबर प्लेटवरून मालकाची माहिती क्षणात मिळेल. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पोलीस आयुक्तालयात एक अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे. या केंद्रातून शहरातील सर्व घडामोडींचे थेट प्रक्षेपण पोलीस आयुक्तांपासून ते स्थानिक पोलीस ठाण्यापर्यंत सर्वांना पाहता येईल. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना जलद प्रतिसाद देणे शक्य होईल.