जपानमधला प्रवास महागणार – प्रस्थान कराचा पर्यटकांना फटका

जपानमध्ये पर्यटकांची वाढलेली प्रचंड गर्दी आणि त्यामुळे स्थानिक पर्यावरणावर तसेच पायाभूत सुविधांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी सरकारने प्रस्थान कर कमीत कमी तीन पटीने वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. सध्या हा कर एक हजार येन आहे, तो वाढवून तीन हजार येन किंवा त्याहून अधिक करण्याचा प्रस्ताव आहे.

जपानमध्ये २०१९ मध्ये परदेशी पर्यटकांवर प्रस्थान कर लागू करण्यात आला होता. हा कर जपानमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच परदेशी पर्यटक आणि जपानी नागरिक दोघांनाही भरावा लागतो आणि तो सध्या एक हजार येन म्हणजे भारतीय चलनात सुमारे पाचशे पंच्याहत्तर रुपये इतका आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षातील काही सदस्यांनी हा कर तीन हजार येन पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर काही जण तो पाच हजार येन पर्यंत वाढवण्याच्या प्रस्ताव दिला आहे.

जपान सरकार आणि सत्ताधारी आघाडीतील कर आयोगाद्वारे या प्रस्तावावर चर्चा केली जात आहे आणि या वर्षाच्या अखेरीस अंतिम निर्णय घेण्याचे उद्दिष्ट आहे. हा कर थेट तिकिटाच्या किंमतीमध्ये जोडला जातो. २०२४ आर्थिक वर्षात, या करातून जपानला विक्रमी बावन्न पूर्णांक चार अब्ज येन महसूल मिळाला आहे.

जपानमध्ये पर्यटकांची विक्रमी संख्या वाढली आहे. २०२४ मध्ये छत्तीस दशलक्षहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. अनेक प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटनाचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ट्रेन, बस आणि विमानतळांवर गर्दी प्रचंड वाढली आहे. माउंट फुजीसारख्या नैसर्गिक स्थळांवर पर्यटकांच्या गर्दीमुळे पर्यावरणीय नुकसान होत आहे. त्यामुळे माउंट फुजीवर यापूर्वीच तीन हजार ते पाच हजार येन इतके प्रवेश शुल्क आकारण्याची योजना आखली गेली आहे. क्योटोसारख्या शहरांमध्ये स्थानिक नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम झाला असून, अनेकदा पर्यटकांच्या गैरवर्तनामुळे नाराजी वाढली आहे. कर वाढवून जमा होणारा अतिरिक्त महसूल खास करून पर्यटकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आणि गर्दी नसलेल्या कमी प्रसिद्ध असलेल्या क्षेत्रांमध्ये पर्यटन विकासासाठी वापरला जाईल.

हा कर वाढवल्यास, जपानचा प्रस्थान कर इतर अनेक विकसित देशांच्या दरांशी जुळेल. ऑस्ट्रेलिया आणि इजिप्त सारख्या देशांमध्ये यापेक्षा जास्त कर आकारला जातो. अधिकाऱ्यांच्या मते, जपानचे सध्याचे दर अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत खूप कमी आहेत. प्रस्थान कर वाढवण्यासोबतच, जपानने परदेशी पर्यटकांसाठी व्हिसा शुल्क देखील वाढवण्याची योजना आखली आहे. या शुल्कात १९७८ नंतर प्रथमच वाढ केली जात आहे.

या निर्णयावर काही जपानी नागरिकांनी आक्षेप घेतला आहे, कारण कर वाढल्यास परदेशात प्रवास करणाऱ्या जपानी नागरिकांनाही जास्त पैसे द्यावे लागतील. सध्या येनचे कमजोर मूल्य असल्याने परदेशी प्रवास जपानी लोकांसाठी महाग झाला आहे आणि हा कर त्यात आणखी भर टाकेल.






15,988 वेळा पाहिलं