हार्बर रेल्वेमार्गावर दोन नवीन रेल्वे स्थानकं – प्रवाशांना दिलासा
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बेलापूर – उरण मार्गावर प्रवाशांसाठी दोन नवीन स्टेशन आणि दहा वाढीव लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. यामुळे नवी मुंबई आणि आजबाजूच्या भागातील प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या बेलापूर – उरण रेल्वेमार्गावरील प्रवाशांना दुहेरी भेट दिली आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्यासाठी बेलापूर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकांचा पर्याय आहे. नव्याने खुले होणारे तरघर हे विमानतळाच्या सर्वाधिक जवळचे स्थानक आहे. त्यामुळे याचा फायदा प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासोबतच गव्हाण हे रेल्वे स्थानक देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. दोन्ही रेल्वे स्थानकांतील कामे पूर्ण झाली आहेत. नोव्हेंबर महिन्यात लोकल फेऱ्या आणि स्थानके एकाचवेळी खुली करण्यात येणार आहेत. गव्हाण रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह, फलाट, तिकीट घर, वाहनतळ यांची कामे पूर्ण झाली असून किरकोळ कामे विद्यमान सुरू आहेत. तरघर आणि गव्हाण या स्थानकांची उभारणी सिडकोने केली आहे.
बेलापूर – उरण मार्गावर लोकल फेऱ्या अत्यंत कमी आहेत. मात्र, या मार्गावर प्रवासी संख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन या मार्गावर दहा लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सुरुवातीला वीस लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन होते. मात्र प्रवासी तिकीट विक्री आणि प्रवासी संख्या लक्षात घेता एकूण दहा लोकल फेऱ्या वाढवण्यावर एकमत झाले आहे.