फिलिपिन्समध्ये चक्रीवादळाचा हाहाकार

फिलिपिन्सच्या ईशान्येकडील किनारपट्टीवर सुपर टायफून फंग-वोंग या अत्यंत शक्तिशाली चक्रीवादळाने धडक दिली. या वादळामुळे भूस्खलन आणि मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता असलेल्या भागातून दहा लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या शक्तिशाली वादळात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

फंग-वोंग हे फिलिपिन्सला या वर्षात धडकणारे सर्वात मोठे आणि धोकादायक चक्रीवादळ आहे. विशेष म्हणजे, या वादळाने अशा वेळी धडक दिली आहे, जेव्हा फिलिपिन्स अजूनही गेल्या आठवड्यात आलेल्या टायफून कालमाएगी या चक्रीवादळाच्या विध्वंसातून सावरत आहे. कालमाएगीमुळे मध्य प्रांतात मोठी जीवीतहानी झाली होती.  एकापाठोपाठ आलेल्या या दोन महासंकटांमुळे फिलिपिन्सचे राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद कार्य पूर्णपणे ताणले गेले आहे.

टायफून फंग-वोंगने फिलिपिन्सच्या मुख्य बेटांपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या लुझोन बेटावरील ऑरोरा प्रांतामध्ये धडक दिली. या सुपर टायफूनने धडक दिली तेव्हा वाऱ्याचा वेग एकशे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास इतका होता आणि वाऱ्याचे झोत दोनशे तीस किलोमीटर प्रतीतास पर्यंत पोहोचले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, फंग-वोंगचा परिघ सुमारे एक हजार आठशे किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे, ज्यामुळे देशाचा सुमारे दोन-तृतीयांश भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठ्याच्या तारा तुटल्यामुळे आणि ग्रीड पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यामुळे, जवळपास तीस लाख घरांतील वीज खंडीत झाली आहे.  

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने वादळाच्या तीव्रतेमुळे लोकांना त्वरित स्थलांतर करण्याचे आवाहन केले. बचाव पथकांनी पूरग्रस्त भागातील अनेक कुटुंबांना घरांच्या छतावरून आणि धोकादायक ठिकाणांहून सुरक्षित बाहेर काढले. संरक्षण सचिवांनी लोकांना सार्वजनिकपणे आवाहन केले आहे की, त्यांनी सरकारच्या स्थलांतराच्या आदेशांचे पालन करावे, कारण शेवटच्या क्षणी बचाव कार्य करणे पोलीस, सैनिक आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

अनेक शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली असून, सुमारे तीनशे पंचवीस देशांतर्गत आणि एकसष्ट आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खराब हवामानामुळे समुद्रात जहाजे चालवण्यास बंदी घालण्यात आल्याने सहा हजार सहाशेहून अधिक प्रवासी आणि मालवाहू कामगार बंदरांवर अडकले आहेत.






11,587 वेळा पाहिलं