
देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा ताण, चिंता, नैराश्य आणि मानसिक दडपण पाहता विद्यापीठ अनुदान आयोगाने आता महत्वाची पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुरक्षित राहावे, त्यांना कोणत्याही वेळी कोणाशी तरी मन मोकळे करता यावे, तसेच संकटाच्या क्षणी योग्य सल्ला मिळावा, यासाठी यूजीसीने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना टेली-मानस या मानसिक आरोग्य हेल्पलाईनचा सक्रिय प्रसार करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात वाढणाऱ्या स्पर्धेमुळे, घरातील ताणांमुळे आणि करिअरच्या दबावामुळे मानसिक समस्यांना तोंड देणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळेच हे पाऊल वेळेची गरज मानले जात आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेली-मानस ही सेवा दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू केली होती. देशभरात पन्नासहून अधिक केंद्रे कार्यरत असून, आतापर्यंत तब्बल तीस लाखाहून अधिक फोनकॉल्स या हेल्पलाईनवर आले आहेत. ही सेवा दिवसाचे चोवीस तास आणि वर्षभर अखंडपणे उपलब्ध आहे. सर्वात मोठी सोय म्हणजे ती वीस भाषांमध्ये दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील किंवा मातृभाषेत बोलणे पसंत करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही भीती न बाळगता तज्ज्ञांशी संवाद साधता येतो. अनेक विद्यार्थ्यांनी या सेवेचा उपयोग करून ताणतणावातून बाहेर पडल्याची नोंदही विविध अहवालांत झाली आहे.
यूजीसीने दिलेल्या नवीन आदेशानुसार, देशातील सर्व शिक्षणसंस्थांनी आपल्या संकेतस्थळांवर, माहिती पुस्तिकांमध्ये, प्रवेश प्रक्रियेतील साहित्यामध्ये आणि कॅम्पसमधील डिजिटल फलकांवर टेली-मानसचे दोन महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या ग्रंथालयांमध्ये, विद्यार्थ्यांच्या विश्रांतीगृहांत, समुपदेशन कक्षांमध्ये आणि नोटीस बोर्डांवर टेली-मानसमोबाईल अनुप्रयोगाचा क्यूआर कोड लावण्याचेही निर्देश दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थी आपल्या मोबाईलवरून थेट मदतीचा वापर करू शकतील.
अनेकदा विद्यार्थ्यांना मनातील चिंता, नैराश्य, अपयशाची भीती, उत्तीर्ण होण्याचा किंवा चांगलं करण्याचा दबाव किंवा घरातील समस्यांमुळे मानसिक उलघाल होते. पण कोणाशी बोलावे, कसे बोलावे आणि आपली समस्या किती गंभीर आहे, हे त्यांना समजत नाही. टेली-मानस ही सुविधा अशा क्षणी विद्यार्थ्यांना एक विश्वासार्ह, गोपनीय आणि संवेदनशील मदत उपलब्ध करून देते. प्रशिक्षित समुपदेशक विद्यार्थ्यांशी शांतपणे संवाद साधतात, त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि गरज भासल्यास तज्ज्ञांकडे मार्गदर्शन देतात. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे मोठी अडचण टळल्याचे उदाहरणेही समोर आली आहेत.
मानसिक आरोग्याबाबत समाजात अजूनही संकोच आणि गैरसमज आहेत. अनेक तरुणांना मदत घेणे म्हणजे कमजोरी वाटते, तर काहींना कुटुंबाची प्रतिक्रिया कशी असेल या भीतीने ते शांत राहतात. यूजीसीने केलेला हा निर्णय त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. महाविद्यालये आणि विद्यापीठांनी टेली-मानसचा प्रसार वाढवल्यास विद्यार्थ्यांना मदत घेणे अधिक सहज होईल. शिक्षणाबरोबरच मानसिक स्थैर्य हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे; आणि त्या दिशेने हे पाऊल देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेने घेतलेला सकारात्मक आणि संवेदनशील निर्णय ठरतो.