ब्रिटनला वादळाचा तडाखा – जनजीवन विस्कळीत

युनायटेड किंगडमला गोरेटी वादळाने मोठा तडाखा दिला असून या संकटामुळे या ठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या भागात वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, वादळ गोरेटी हे अत्यंत वेगाने अधिक शक्तिशाली झाले आहे. दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील कॉर्नवाल आणि आयल्स ऑफ सिली भागात ताशी शंभर मैल वेगाने वारे वाहत आहेत. या भीषण वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी घरांची छपरे उडाली असून झाडे उन्मळून पडली आहेत.

या वादळामुळे उत्तरेकडे बर्फाचे मोठे वादळ निर्माण झाले आहे. प्रामुख्याने वेल्स आणि मिडलँड्स भागासाठी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात दहा ते पंधरा सेंटीमीटर, तर उंचावर असलेल्या ठिकाणी तीस सेंटीमीटरपर्यंत बर्फ साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक रस्ते बर्फाच्या चादरीखाली लुप्त झाले असून रस्ते वाहतूक धोक्यात आली आहे. कॉर्नवाल परिसरासाठी हवामान विभागाने दुर्मिळ असा रेड अलर्ट जाहीर केला आहे. याचा अर्थ, हवामानाचा हा प्रकार केवळ त्रासदायक नसून जीवितास धोका निर्माण करणारा आहे. समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड उंचीच्या लाटा उसळत असून, किनाऱ्यावरील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मोबाईलवर आपत्कालीन संदेश पाठवून त्यांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वादळामुळे ब्रिटनच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. कॉर्नवाल आणि दक्षिण-पश्चिम भागातील सर्व रेल्वे सेवा गुरुवारी सायंकाळपासून बंद करण्यात आल्या आहेत. बर्मिंगहॅम विमानतळावर धावपट्टीवर बर्फ साचल्याने उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. तसेच लंडनहून जाणाऱ्या युरोस्टार सेवांनाही विलंब होत आहे. खराब हवामानामुळे ब्रिटनमधील हजारांहून अधिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रात्रीपर्यंत दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील सुमारे सत्तेचाळीस हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वेगवान वारे आणि बर्फामुळे विजेच्या तारा तुटल्या असून त्या दुरुस्त करण्यात अडचणी येत आहेत. अनेक ग्रामीण भागांत मोबाईल सिग्नल आणि इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. रस्ते निसरडे झाले आहेत आणि तापमानात प्रचंड घट झाली आहे. ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेने थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने अकरा जानेवारीपर्यंत आरोग्य इशारा दिला आहे.






1,737 वेळा पाहिलं