
‘उंबरपाडा’ हे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेले एक गाव आहे. नाशिक-पेठ रस्त्यावर ४० किलोमीटरवर ‘करंजाळे’ हे गाव लागते. या गावातून उजव्या हाताला ‘उंबरपाडा’ गावाकडे घेऊन जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने पाच किलोमीटर पुढे गेल्यावर आदिवासी निवासी शाळा दिसते. या शाळेकडून काहीसे पुढे जावे म्हणजे उंबरपाडा गावाची कमान मिळते. उंबरांच्या झाडांनी वेढलेले गाव असल्याने या गावाला ‘उंबरपाडा’ असे नाव पडले असावे, असे येथील आदिवासी बांधव सांगतात; मात्र आता उंबरांची झाडे या गावात नाहीत. वारली, कोळी, कोकणा आदिवासींची वस्ती या गावात आहे. हे गाव ‘गावंधपाडा श्रीमंत’ धरणालगत वसलेले आहे.
या गावचा उदरनिर्वाह ‘शिराई’ उद्योगावर अवलंबून आहे. हा व्यवसाय मागील अनेक पिढ्या करीत आहेत. या गावात पावसाळ्यात शेती व इतरवेळी शिराईचे उत्पादन घेतले जाते. शिराई हा केरसुणीचा एक प्रकार आहे. केरसूणी, झाडू, शिराई यांची उंची, रूंदी व बनविण्याच्या पद्धती थोड्याफार प्रमाणात वेगळ्या आहेत; मात्र सर्वांना एकत्रितपणे झाडूच म्हटले जाते. कोकणात झाडू हिरांचेच करतात. त्याला ‘केरसुणी’ किंवा ‘वाढवण’ म्हणतात. देशावर हिराची केरसुणी क्वचितच वापरतात. तेथे तिला ‘खराटा’ म्हणतात. गवतापासून केलेल्या झाडूंना ‘कुंचले’ म्हणतात.
शिराई म्हणजे शिंदीच्या बनविलेला झाडू असतो. शिंदीच्या पानांना लहानलहान सुयांच्या सहाय्याने बारीक केले जाते. या झुबक्यापासून प्रत्येक पानाच्या लहान शिरा वेगळ्या केल्या जातात. या शिरांच्या चार-पाच पात्यांपासून तयार झालेला झाडू म्हणजे शिराई असते. येथील आदिवासी झाडूला लक्ष्मीचे प्रतिक मानतात. अगदी झाडू कुठे व कसा ठेवावा याबाबतही समजुती आहेत. शिंदीच्या पानांसाठी आदिवासींना शहरातील सातपूर, बेळगाव ढगा, त्र्यंबक व आडगाव परिसरावर अवलंबून रहावे लागते. शिंदीची ताड,शिंदी, भैरली, माड किंवा नारळी ही झाडे कमी होऊ लागल्याने त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावरही दिसू लागला आहे. उंबरपाडा गावात गेल्यावर ही कलात्मकता दिसते. शिवाय गावात आकर्षक लाकडी बांधणीचे हनुमान मंदिर आहे. धरणाचे विहंगम दृश्य येथे दिसते. त्यामुळे हे एक सुंदर असे पर्यटनस्थळ आहे.