
अमेरिकेच्या हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राईक कमांडने कॅलिफोर्नियातील व्हॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून निशस्त्र मिनिटमॅन-तीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. हे क्षेपणास्त्र सुमारे चार हजार दोनशे मैलांचे अंतर पार करत मार्शल द्वीपसमूहाजवळील रोनाल्ड रीगन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डिफेन्स टेस्ट साइट येथे लक्ष्यावर उतरले. या प्रक्षेपणाद्वारे अमेरिकेच्या क्षेपणास्त्र प्रणालीची कार्यक्षमता, अचूकता आणि तत्परता तपासण्यात आली.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अण्वस्त्र चाचण्यांबाबत केलेल्या विधानानंतर ही चाचणी झाल्याने तिची विशेष चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांनी म्हटले होते की, रशिया, चीन आणि पाकिस्तानसारखे देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. त्यामुळे अमेरिका मागे राहू शकत नाही. या वक्तव्यानंतर त्यांनी संरक्षण मंत्रालयाला क्षेपणास्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ही चाचणी नियमित सरावाचा भाग असून, तिचा कोणत्याही देशाशी किंवा सध्याच्या जागतिक घडामोडींशी थेट संबंध नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
मिनिटमॅन-तीन हे अमेरिकेचे सर्वात जुने लँड-बेस्ड आयसीबीएम असून ते १९७० पासून सेवेत आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे तेरा हजार किलोमीटरपर्यंत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात अण्वस्त्र लावता येतात. मात्र, या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्रात कोणतेही अण्वस्त्र नव्हते.
अमेरिकेकडे सध्या अशा प्रकारचे सुमारे चारशे मिनिटमॅन-तीन मिसाईल्स कार्यरत आहेत. या क्षेपणास्त्रांचा उद्देश रशिया आणि चीनसारख्या देशांकडून संभाव्य हल्ल्यांचा सामना करणे आणि अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता कायम ठेवणे हा आहे. या क्षेपणास्त्राचे नाव मिनिटमॅन असे ठेवण्यात आले. कारण ते फक्त एका मिनिटात प्रक्षेपणासाठी सज्ज होते. अमेरिका आता २०३० पर्यंत या प्रणालीचे आधुनिकीकरण करत आहे. एलजीएम- पस्तीस ए सेंटिनेल नावाच्या नवीन प्रकल्पाद्वारे मिनिटमॅन-तीन ला अधिक अत्याधुनिक रूप दिले जाणार आहे. यामुळे पुढील दशकांतही अमेरिकेची अण्वस्त्र सज्जता अबाधित राहील.
या प्रक्षेपणाने अमेरिकेने आपल्या तयारीचा आणि तांत्रिक सामर्थ्याचा पुरावा पुन्हा जगासमोर ठेवला आहे. सोबतच हे स्पष्ट केले आहे की, ही चाचणी अण्वस्त्र चाचणी नसून तांत्रिक सज्जतेचा नियमित भाग होती.