एसटी प्रवासात बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्याबसेसमधून सवलतीच्या दरात किंवा मोफत प्रवास करण्यासाठी बनावट दिव्यांग ओळखपत्रांचा वापर करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. एसटी महामंडळाने अशा बनावटगिरीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यापुढे बनावट ओळखपत्र वापरणाऱ्या प्रवाशांवर थेट पोलीस कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एसटी महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना बस प्रवासात मोठी सवलत दिली जाते. मात्र, गेल्या काही काळापासून या सुविधेचा गैरफायदा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक व्यक्ती बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे किंवा इतरांच्या ओळखपत्रांचा वापर करून सवलतीत प्रवास करत होत्या. यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत होते आणि खऱ्या गरजू दिव्यांगांना सुविधेचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी या गैरप्रकारांना चाप लावण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवाशांकडील वैश्विक दिव्यांग ओळखपत्राची अत्यंत बारकाईने तपासणी केली जाणार आहे. एसटीचे वाहक आता मोबाईल ॲप किंवा ईटीआयएम मशीनच्या माध्यमातून या कार्डावरील क्यूआर कोड स्कॅन करून त्याची वैधता तपासणार आहेत. कार्डावरील फोटो, दिव्यांगाचे नाव, प्रमाणपत्राची मुदत आणि प्रत्यक्ष प्रवास करणारी व्यक्ती यांची पडताळणी केली जाईल. जर यामध्ये तफावत आढळली, तर ते कार्ड जप्त केले जाईल.
फक्त दंड आकारून महामंडळ थांबणार नाही, तर बनावट कागदपत्रे वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कोणाकडेही संशयास्पद किंवा बनावट कार्ड आढळल्यास तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येईल. महामंडळाच्या या निर्णयाचे दिव्यांग संघटनांकडून स्वागत होत आहे. बनावट प्रवाशांमुळे बसेसमध्ये गर्दी होते आणि ज्यांना खरोखर मदतीची किंवा जागेची गरज असते, अशा दिव्यांगांना बसमध्ये चढताना किंवा बसताना त्रास होतो. या कारवाईमुळे केवळ पात्र लाभार्थ्यांनाच सवलतीचा लाभ मिळेल आणि सरकारी तिजोरीची होणारी लूट थांबेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.