वाढवण बंदर प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला देणार नवी दिशा

राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणारा वाढवण बंदर प्रकल्प हा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास साध्य होईल. तसेच, सागरी व्यापार क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळून महाराष्ट्र देशाच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे उमटेल, असे बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी सांगितले.

‘इंडिया मेरीटाईम आठवडा – 2025’ अंतर्गत झालेल्या ‘वाढवण साकारतेय राज्याच्या पुढाकारातून घडणारा जागतिक केंद्रबिंदू’ या चर्चासत्रात अपर मुख्य सचिवसेठी यांच्यासह जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेश वाघ, जेएसडब्ल्यू इन्फ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक रिंकेश रॉय तसेच अदाणी पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव चौधरी उपस्थित होते. या चर्चासत्रात सर्व मान्यवरांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या महत्त्वावर सखोल चर्चा केली.

अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी सांगितले की, “या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेत मोठी वाढ होईल आणि निर्यात-आयात प्रक्रियेला नवा वेग मिळेल. हा प्रकल्प केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून, हरित आणि शाश्वत विकासाच्या तत्त्वांवर आधारित आहे. जहाज बांधणी उद्योगामुळे देशांतर्गत जहाज निर्मिती क्षेत्राला चालना मिळेल. यामुळे रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि स्थानिक उद्योगांना मोठे प्रोत्साहन मिळेल.” तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था या प्रकल्पात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत, हे या प्रकल्पाच्या विश्वासार्हतेचे द्योतक आहे.

वाढवण बंदर उभारणे ही केवळ सुरुवात आहे; त्यासोबत संपूर्ण औद्योगिक परिसंस्था तयार करण्यात येईल. मालाची आयात आणि निर्यात सुरळीत व्हावी यासाठी फक्त बंदर बांधणे पुरेसे नाही, तर क्लस्टर आधारित मालवाहतूक व्यवस्था आणि मजबूत जोडणी प्रणाली उभारावी लागेल. हा प्रकल्प दोन मोठ्या औद्योगिक राज्यांना जोडणारा असल्यामुळे देशाच्या उत्पादन क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल. सिंगापूरमधील प्रगत बंदरांच्या धर्तीवर येथे काम करण्यात येत असून, सर्व संबंधित संस्थांमध्ये डिजिटल आणि तांत्रिक एकत्रीकरण करण्यात येत आहे, ज्यामुळे कामकाजात गती, अचूकता आणि कार्यक्षमतेत वाढ होईल.

या प्रकल्पामुळे बंदर क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. त्यासाठी विशेष कौशल्य विकास संस्था स्थापन करून युवकांना विविध कामांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे स्थानिक युवकांचा सहभाग वाढेल आणि विकास प्रक्रियेत त्यांचे योगदान अधिक बळकट होईल. वाढवण बंदर प्रकल्प हा ‘भारत 2047’ च्या उद्दिष्टपूर्तीत मोलाची भूमिका बजावणार असून, महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक वाटचालीत तो नवा अध्याय लिहिणारा ठरेल.






4,137 वेळा पाहिलं