
वेंगुर्ला’ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारे एक शहर आहे. काजू, आंबा, नारळ आणि विविध प्रकारच्या झाडांनी या शहराची शोभा वाढते. वेंगुर्ला हे एक बंदर आहे. या बंदरावर नेहमी वर्दळ असते. वेंगुर्ला बंदरावरून विशाल समुद्राचे मनोहारी दर्शन होते. येथे वाळूवरून चालण्याचा आनंद घेता येत नाही; पण या बंदरावर मनसोक्त फिरून सागर न्याहाळता येतो. रोज सकाळी आणि रात्री येथे स्थानिक मच्छीमार बांधवाची मोठी लगबग असते. या वेळेत माशांचा लिलाव होतो. त्यामुळे हे बंदर नेहमी गजबजलेलेच असते. येथे दीपगृह आहे. पर्यटक नेहमी बंदर पाहण्यास येथे येतात. येथून सूर्यास्ताचे मस्त दर्शन घेता येते.
या शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. वेंगुर्ला तालुक्यात देवी सातेरी, श्री रामेश्वर ही देवस्थाने आपण पाहू शकता. हापूस आंबे आणि काजूसाठी वेंगुर्ला प्रसिद्ध आहे. वेंगुर्ला हे एक सुरक्षित आणि नैसर्गिक बंदर आहे. सन 1665 मध्ये डच व्यापाऱ्यांनी आणि नंतर ब्रिटिश शासकांनी येथे वखार स्थापन केली. 130 वर्षे जुनी वेंगुर्ला नगरपरिषद ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक आहे.