गोराईतील विश्व विपश्यना पॅगोडा

मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला विश्व विपश्यना पॅगोडा हा जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास आले आहे. जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट देत असतात. गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी सन २००० मध्ये हा पॅगोडा बांधण्यात आला आहे. येथे विपश्यना ध्यानधारणेची माहिती दिली जाते. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट देत असतात. महाराष्ट्रातील हे एक आश्चर्य आहे.

जून २०१३ मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व विपश्यना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. पॅगोडामध्ये असलेल्या गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हातून परावर्तित होणाऱ्या तरंग लहरी विपश्यना करणाऱ्या साधकांना त्यांच्या ध्यानधारणेत सहाय्य करुन मनःशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देतात. एकाच वेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर असून ते भूकंपरोधक आहे. मुंबई परिसरात आज साधारण १५० जवळपास बौद्ध लेणी असली तरी मुंबईला भगवान बुद्धाचा सहवास इथेच लाभला आहे. विपश्यना ही सुरुवातीला फक्त बौद्ध भिक्षूंसाठी होती, पण एस. एम. गोयंका यांनी ती उपासकांपर्यंत पोहचवली.

गोराईच्या या विश्व विपश्यना पॅगोडामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवल्या आहेत. असे म्हणतात, की भगवान बुद्ध इथे त्यांच्या धम्मकायेने राहतात. शरीरधातूरूपात निवास करतात. येथील एका स्तूपाच्या घुमटीत गौतम बुद्धांचे असलेले शरीरधातू म्हणजे गोराईच्या या पॅगोडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. विपश्यना हा एक ध्यान करण्याचा मार्ग आहे. यात साधक पारंगत झाल्यावर निर्वाण मार्गाची शिडी चढू लागतो. येथे विपश्यनेला कुठल्याही जाती-धर्माचे बंधन नाही. पॅगोडाच्या मध्यभागी असलेल्या धर्मचक्रावर गौतम बुद्धांचे शरीर अवशेष ठेवण्यात आले आहेत.

आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात ‘भट्टिप्रोलु’ या पुरातत्त्वीय स्थळी सन १८९२ मध्ये उत्खनन करताना गौतम बुद्धांचे अवशेष सापडले होते. ते चेन्नईच्या शासकीय वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आले. सन १९२१ मध्ये बोधगयेच्या महाबोधी सोसायटीला हे शरीरधातू हस्तांतरित करण्यात आले. सन २००६ मध्ये यापैकी काही अवशेष गोराईच्या विश्व विपश्यना पॅगोडामध्ये ठेवण्यात आले आहेत. येथे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकावर उतरून गोराईला यावे. तेथील जेट्टीवरून पॅगोडाला जाणाऱ्या बोटीने जावे. पुढे चालत गेल्यावर पॅगोडाला पोहोचता येते.






15,336 वेळा पाहिलं