
दक्षिण अमेरिकेतील चिली देश सध्या भीषण वणव्याच्या विळख्यात सापडला असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो एकर जंगल आणि शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. वाढते तापमान आणि सोसाट्याचा वारा यामुळे आग विझवण्यात अडथळे येत असल्याने चिलीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
चिलीच्या मध्य आणि दक्षिण भागात आगीचा सर्वाधिक प्रभाव जाणवत आहे. विशेषतः वाल्पाराईसो प्रांतात आगीने रौद्र रूप धारण केले आहे. हा भाग पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, आगीमुळे येथील अनेक निवासी वस्त्या धोक्यात आल्या आहेत. आगीचे लोट इतके भीषण आहेत की, लांबूनच आकाशात काळ्या धुराचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय अंदाजानुसार, हजारो हेक्टर जमिनीवरील वनस्पती आणि जैवविविधता या आगीत नष्ट झाली आहे. या आगीत अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. अनेक भागात बचाव पथके अद्याप पोहोचू शकलेली नाहीत. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, निवारा छावण्यांमध्ये त्यांची सोय करण्यात आली आहे. अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई आणि घरे डोळ्यादेखत जळताना पाहिली आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी लष्कराला पाचारण केले आहे. आम्ही आमच्या सर्व शक्तीनिशी या आगीचा मुकाबला करत आहोत. नागरिकांचे प्राण वाचवणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे त्यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले. आणीबाणी जाहीर केल्यामुळे आता सरकारला अतिरिक्त निधी आणि लष्करी संसाधने थेट बाधित क्षेत्रात वापरता येणार आहेत. तसेच, मदत कार्याला गती देण्यासाठी काही भागांत संचारबंदी देखील लागू करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चिलीमध्ये सध्या जाणवणारी उष्णतेची लाट आणि प्रचंड कोरडे हवामान हे या वणव्याचे प्रमुख कारण आहे. एल निनो प्रभावामुळे दक्षिण अमेरिकेतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीच्या ठिणग्या दूरवर उडत असून, नवीन भागात आग वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. अग्निशमन दलाच्या शेकडो गाड्या, हेलिकॉप्टर्स आणि विमाने आग विझवण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. मात्र, धुराचे लोट आणि कमी दृश्यमानता यामुळे हवाई मोहिमांमध्ये अडथळे येत आहेत. अनेक रस्ते आगीमुळे बंद करण्यात आले असून, वीज आणि पाणी पुरवठा खंडित झाला आहे.