
‘यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य’ हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक आहे. सांगली जिल्ह्यातील ‘वाळवा’ तालुक्यात ‘कृष्णा’ नदीच्या खोऱ्यात असलेले हे अभयारण्य सागरोबा डोंगरावर वसले आहे. सन १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
धो.म. मोहिते या वनस्पती आणि वन्यजीवप्रेमीच्या ध्यासातून हे अभयारण्य साकारले आहे. वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य आहे. येथील भरपूर पाऊस, दाट धुके, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्नता प्रदान करतो. येथे असलेले छोटे-मोठे धबधबे पर्यटकांना चिंब भिजण्याचा आनंद मिळवून देतात.
सागरेश्वर अभयारण्य मिरज रेल्वे स्थानकापासून 60 किलोमीटर, कराडपासून 30 किलोमीटर तर ताकारी रेल्वे स्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. कराड येथून सागरेश्वरला पोहोचण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी पावसाळा उत्तम कालावधी आहे.
या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचे मंदिर आहे. एवढेच नव्हे तर एकूण 47 प्राचीन मंदिराचा समूह येथे आहे. 13 ओवऱ्या आहेत. आंघोळीचे आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे असून या कुंडात वर्षभर पाणी असते.
सागरेश्वर अभयारण्य हे ‘कडेगाव’, ‘वाळवा’ आणि ‘पलूस’ या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्यार सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्या माथ्यावर आहे. येथे जाण्यासाठी ‘देवराष्ट्र’ गावात जावे लागते. तेथे पोहोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो.
सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. अंजन, धावडा, चंदन, धायटी, बाभूळ, सुबाभूळ, निलगिरी,कशिद, गुलमोहर, आपटा, सीताफळ तसेच घाणेरी आदी वृक्ष आहेत. साळींदर, हनुमान लंगूर, सांबर, चितळ, काळवीट, लांडगा, ससा, खार, खोकड, कोल्हा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्ष्यांचे नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे.
येथे १४२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. हळद्या, साळुंखी, मैना, सुगरण, चष्मेवाला, पिंगळा, गव्हाणी घुबड, मुनिया, सुर्यपक्षी, नाचण, सातभाई, चंडोल,राखी वटवट्या, कोतवाल, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, भारद्वाज, पावश्या, पोपट, कोकिळ, हरियाल, मोर, गाय बगळा असे पक्षी येथे आहेत.
वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. ‘रणशूळ पॉईंट’ हे अभयारण्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे.