
येमेनच्या दक्षिणेकडील भागातील मुख्य प्रवेशद्वार मानले जाणारे एडन आंतरराष्ट्रीय विमानतळ तांत्रिक कारणास्तव नव्हे, तर राजकीय संघर्षामुळे ठप्प झाले आहे. सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यातील शीतयुद्ध आता उघडपणे समोर आले असून, त्याचे पडसाद विमान वाहतुकीवर उमटले आहेत. येमेनच्या एडन विमानतळावरील विमानसेवा गुरुवारी अचानक बंद करण्यात आली. या घटनेमुळे येमेनमध्ये एक नवीन राजकीय संकट उभे राहिले आहे.
या वादाची सुरुवात सौदी समर्थित येमेन सरकारने यूएईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांवर घातलेल्या नवीन निर्बंधांमुळे झाली. सौदी समर्थित सरकारने असा आदेश दिला होता की, एडनमधून जाणाऱ्या सर्व विमानांनी तपासणीसाठी आधी सौदीच्या जेद्दाह विमानतळावर उतरणे अनिवार्य आहे. वाढता तणाव कमी करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी ही नियामक पावले असल्याचे सौदीने म्हटले. एडनमध्ये प्रभावशाली असलेल्या सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल या यूएई समर्थित फुटीरतावादी गटाने या निर्बंधांना कडाडून विरोध केला. त्यांचे परिवहन मंत्री यांनी सौदीचे निर्बंध पाळण्याऐवजी संपूर्ण विमानतळाचीच वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले.
विमानतळ अचानक बंद झाल्यामुळे शेकडो प्रवासी टर्मिनलवर अडकून पडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपचारासाठी परदेशात जाणारे रुग्ण आणि वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. आम्ही तासनतास वाट पाहत आहोत, पण पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही, अशी प्रतिक्रिया अडकलेल्या प्रवाशांनी दिली आहे. काही स्थानिक सूत्रांनुसार, यूएई व्यतिरिक्त इतर देशांसाठी विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, या वादाचा येमेनच्या आधीच ढासळलेल्या मानवी परिस्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.